भारतीय संविधान हा सर्व भारतीयांना एकमेकांशी जोडणारा एक मजबूत धागा आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी येथे व्यक्त केले. ‘घटनात्मक अधिकार संवर्धन समिती ’ च्या माध्यमातून आयोजित केलेल्या रविनंद होवाळ यांनी लिहिलेल्या ‘संक्षिप्त, रूपांतरित, संपूर्ण भारतीय राज्यघटना’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी आयोजित केलेल्या दिगंबर जैन बोर्डिंग येथील कार्यक्रमात ते बोलत होते.    
याप्रसंगी ‘भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार’ या विषयावर झालेल्या परिसंवादात भाग घेताना होवाळ यांनी भारतीय संविधानाच्या तिसऱ्या भागात कलम क्र.१२ ते ३५ मध्ये नमूद केलेल्या सर्व भारतीयांच्या मूलभूत अधिकारांचा आढावा घेतला. हे अधिकार आणि त्यातून मिळालेले संरक्षण हे कोणत्याही विशिष्ट जाती अथवा समूहासाठी नसून ते धर्म, वंश, जात, लिंग, भाषा, प्रांत विरहित भावनेने सर्व भारतीयांसाठी लागू झालेले अपूर्व अशा पध्दतीचे संरक्षण आहे, त्यामुळे ते समजून घेऊन नागरिकांनी त्यांचे प्राणपणाने जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी शाहू कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार, रत्नाप्पाण्णा कुंभार नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांनीही आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, लोकजनशक्तीचे बाळासाहेब भोसले, नामदेव कांबळे, श्रीराम कमतनुरे, डी.आर.शिंदे, प्राचार्य बी.एस.काळे, प्रा.उषा काळे, गौतम माने, कोमल माने, डॉ.श्रीकृष्ण महाजन यांच्यासह अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.एस.कांबळे यांनी केले. तर प्रास्ताविक अॅड.डी.एस.कांबळे यांनी केले.