पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने या वर्षी गळीत हंगामात उसाला अडीच हजार रुपयांप्रमाणे पहिली उचल देत असताना मराठवाडय़ातील साखर कारखाने मात्र दोन हजार रुपयेच उचल शेतकऱ्यांना देत आहेत. मराठवाडय़ातल्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची ही आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
या प्रकरणी आठ दिवसांत साखर कारखान्यांनी निर्णय न घेतल्यास शिवसेना या प्रश्नी आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, उपजिल्हाप्रमुख अजित वरपुडकर, तालुकाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, पंचायत समिती सभापती कवसाबाई सुगंधे, भास्कर देवडे, नंदू अवचार आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. साखर उतारा कमी असल्याने कारण देत मराठवाडय़ातले साखर कारखानदार दोन हजार रुपये पहिली उचल देत आहेत. यास काही साखर कारखाने अपवाद असले तरी बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांना लुबाडणे सुरू केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्यांना अडीच हजार व मराठवाडय़ातल्या काही कारखान्यांना २ हजार २५१ हा भाव परवडत असेल, तर अन्य साखर कारखान्यांना तो का परवडू नये, असा सवाल निवेदनात केला आहे.