स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा सरकारने निर्णय घेतल्यानंतर नवी मुंबईत होणारी ही पालिकेची पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे पालिकेतील १११ प्रभागांपैकी ५६ प्रभागांतून महिला निवडून येणार आहेत. याशिवाय चार-पाच पुरुषांच्या प्रभागांत महिला टक्कर देण्यास तयार झालेल्या आहेत. त्यामुळे महिलांची संख्या ६० पर्यंत जाणार आहे. साहजिक या निवडणुकीत सर्वाधिक प्रचार साहित्य महिलांकडून वापरले जाणार असून त्यात साडी, साडय़ांच्या पिना, मफलर, उन्हासाठी छत्र्या, हातातील ब्रेसलेट आणि छल्ले अशा वस्तूंचा समावेश आहे. वीस ते पंचवीस रुपयांत मिळणाऱ्या या वस्तूंसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. वाशी येथील कोपरी गावाजवळच्या सेकंड हॅण्ड कार मार्केटजवळ अशा निवडणूक वस्तूंची दोन दुकाने थाटण्यात आली असून या ठिकाणी महिला प्रचार साहित्यांचा जास्त खप असल्याचे दुकानदारांनी सांगितले. तीन दिवसांत ऑर्डरप्रमाणे हे साहित्य तयार करून दिले जात असून यात कमरेला लटकविण्याच्या छल्ल्याला मोठी मागणी आहे. शिवसेनेच्या महिला उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यां हा छल्ला आवडीने नेत असून तो दिमाखात वापरला जात आहे. महिलांबरोबरच पुरुष उमेदवारदेखील हे छल्ले खूप मोठय़ा प्रमाणात खरेदी करीत असून प्रचारातील महिला कार्यकर्त्यांना ते वाटले जात आहेत. प्रचाराची काही चिन्हेदेखील शनिवारपासून विकली जाणार आहेत. यात शिट्टीला मोठी मागणी आहे. मतदारांना हे चिन्ह वाटपासाठी सोयीचे पडत असल्याने अनेक अपक्ष उमेदवारांनी शिट्टीची मागणी नोंदवून ठेवली आहे. प्रचार साहित्याच्या या विक्रीबरोबरच या दुकानदारांकडून मतदार यादीची आद्याक्षरानुसार यादी तयार करून दिली जात आहे. थोडक्यात निवडणुकीचे ए टू झेड साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यात छल्ल्याने बाजी मारली आहे.