शहरात प्रथमच बालाजी अमाईन्स लि. या उद्योग समूहाद्वारे उभारण्यात आलेल्या पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियरचे उद्घाटन येत्या शनिवारी, १२ ऑक्टोबर रोजी बँक ऑफ बडोदाचे सरव्यवस्थापक (महाराष्ट्र व गोवा) के. एन. मानवी यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे १०० कोटी खर्च करून उभारल्या गेलेल्या या पहिल्या पंचतारांकित हॉटेलमुळे सोलापूरच्या लौकिकात भर पडणार आहे.
होटगी रस्त्यावरील आसरा चौकाजवळ तीन एकर जागेवर उभारलेल्या या हॉटेलमध्ये १२९ अद्ययावत खोल्यांची रचना असून शिवाय कोर्ट यार्ड  (मल्टिक्युझिन रेस्टाँरंट), दि ओरिएंटल ब्लॉसम (चायनिज सेझवान रेस्टाँरंट) व हाय पॉइंवट (लाऊंज बार) असे खवय्यांसाठी तीन विविध विभाग सज्ज आहेत. लग्न सोहळा, परिषद, प्रदर्शन आदी समारंभांसाठी १२ हजार चौरस फुटाचा ‘पृथ्वी’ बेन्क्वेट हॉल उपलब्ध असून इतर छोटेखानी कार्यक्रमांसाठी ‘वायू’, ‘जल’ व ‘आकाश’ हे तीन पार्टी हॉलही उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरण तलाव, स्पा, फिटनेस सेंटरही उभारण्यात आले आहे. सोलापुरातील पंचतारांकित दर्जाचे हे पहिलेच हॉटेल सरोवर प्रीमियर हॉटेल्स या नामांकित समूहाला १२ वर्षांच्या कराराने चालविण्यास देण्यात आले आहे. याबाबतची माहिती बालाजी अमाईन्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या हॉटेलच्या उद्घाटन सोहळयास सरोवर हॉटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनिल मधोक व बालाजी अमाईन्सचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ए. प्रताप रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सरोवर हॉटेल्स हे देशातील नामवंत समूह असून बालाजी सरोवर प्रीमियर हॉटेल हे सोलापुरातील पहिले व राज्यातील नववे हॉटेल आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात सोलापूर अद्यापि मागे असून आंतरराष्ट्रीय कॉर्गो विमानतळ व अन्य सुविधांसह विविध औद्योगिक विकास होण्यास आणखी किमान पाच वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार असताना बालाजी सरोवर प्रीमिअर हॉटेलची उभारणी करून आपण जोखीम पत्करली आहे. मात्र नंतरच्या काळात सोलापूरचे भवितव्य उज्वल असल्यामुळे आपली गुंतवणूक लाभदायी ठरेल, असा विश्वास राम रेड्डी यांनी व्यक्त केला. शासनाने या हॉटेलसाठी सात वर्षांकरिता कर सवलत दिली आहे. मात्र सोलापूर महापालिकेकडून प्रोत्साहनपर कर, पाणी दरात सवलत मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी बालाजी अमाईन्सचे सह व्यवस्थापकीय संचालक एन. राजेश्वर रेड्डी, हॉटेलचे सरव्यवस्थापक बíझन मास्टर व संदीप  जव्हेरी आदी उपस्थित होते.