म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमधून माझ्यासारखे अनेक गायक-गायिका पुढे येत असले तरी सिनेमात पाश्र्वगायन करायला मिळणे ही खूप वेगळी बाब आहे. सिनेमा क्षेत्रात पाश्र्वगायनासाठी खूप वेळ द्यावा लागतो. त्याचप्रमाणे संगीत दिग्दर्शक हा सिनेमाच्या जगङ्व्याळ कामातील साहाय्यक कलावंत असतो. आजच्या जमान्यात तर संगीत दिग्दर्शकाला निर्माते-दिग्दर्शक व अन्यही अनेकांची मते जाणून घेऊन काम करायला लागते. त्यामुळे पाश्र्वगायनाची संधी मला मिळाली असली तरी तिथे आपले स्थान निर्माण करण्यासाठी ‘स्ट्रगल’ अजूनही करतोय, असे इंडियन आयडॉल रिअ‍ॅलिटी शोचा पहिला विजेता अभिजीत सावंतने स्पष्टपणे सांगितले.
सिनेमात पाश्र्वगायन करायला मिळावे, आपण गायलेली गाणी लोकांना आवडावीत असे नक्कीच वाटते. ‘चितगाँग’, ‘तीस मार खान’ यांसारख्या चित्रपटातून पाश्र्वगायन केले आहे, परंतु पाश्र्वगायन क्षेत्रात काम करण्याची पद्धत निराळी आहे. ती एक स्वतंत्र इंडस्ट्रीच आहे. संगीत दिग्दर्शकाला गायकाची निवड करताना आजकाल खूप विचार करावा लागतो. कारण संगीत दिग्दर्शक सिनेमाचा हीरो नसतो तर साहाय्यक भूमिकेतला असतो, त्यामुळे त्याला निर्माता-दिग्दर्शकाबरोबरच टीममधील अनेकांची मते जाणून घेऊन त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो, म्हणूनच रिअ‍ॅलिटी शोमधून अनेक गायक-गायिका संगीत क्षेत्रात येत असले तरी पाश्र्वगायनामध्ये दिसत नाहीत, असे अभिजीत सावंत म्हणाला.
अभिजीत सावंतचा ‘फरीदा’ हा तिसरा सोलो अल्बम नुकताच प्रकाशित झाला. तिसरा अल्बम यायला एवढा कालावधी का लागला असे विचारले असता त्याने सांगितले की, पंजाबी, सुफी पद्धतीची गाणी यात आहेत. पंजाबी भाषेतील उच्चार शिकावे लागले. मराठी गायक पंजाबीत गातोय हे समजू नये यासाठी उच्चारांवर खूप मेहनत घ्यावी लागली त्यामुळे जवळपास दोन वर्षे फरीदा अल्बमचे काम सुरू होते हे एक कारण आहे आणि दुसरे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे साधारण २००७ सालापासूननंतरचा काही काळ नीट लक्षात घेतला तर माहिती तंत्रज्ञानामुळे संगीत क्षेत्रात अनेक बदल झपाटय़ाने झाले. आधी सीडीवर संगीत ऐकले जायचे. आता त्यात एमपी थ्री व अन्य माध्यमांची भर पडली आहे. त्याचप्रमाणे मधल्या काळात कॉलरटय़ून, रिंगटोनचा जमाना आला. त्यामुळेही मध्ये गॅप घेऊन आता अल्बम काढला, असे कारण अभिजीत सावंतने सांगितले. सिनेमा पाश्र्वगायन क्षेत्रात आजही ‘मोनोपॉली’ आहे.  रिअ‍ॅलिटी शोमधले अलीकडे विजेते ठरलेले गायक-गायिका यांना चांगली पाश्र्वभूमी असते. माझ्यावेळी तसे नव्हते. गुणवत्ताही त्यांच्याकडे आहेच. परंतु युटय़ूब, इंटरनेटसारख्या नवीन माध्यमांमुळे आजच्या पिढीच्या गायक-गायिकांना चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. स्वत:ची गैरफिल्मी गाणी त्यांना लोकांपर्यंत पोहोचविता येताहेत. त्याचबरोबर या नव्या माध्यमांमधून पैसाही मिळतो. २००८ नंतरचा काही काळ गैरफिल्मी अल्बमला खूप मागणी नव्हती. कॉलरटय़ून कल्चरचा प्रभाव खूप होता. सिनेमातील २-३ गाणी चांगली हिट झाली, रसिकांमध्ये गुणगुणली जाऊ लागली तर पाश्र्वगायकाला मग पुढचा मार्ग सोपा ठरतो. त्याची ओळख निर्माण व्हायला मदत होते, परंतु स्ट्रगल तर अजूनही करतोय, असेही त्याने नमूद केले.
मराठी सिनेमासृष्टीकडून विचारणा होतेय का, असे विचारले तेव्हा हो असे उत्तर देऊन अभिजीत म्हणाला फरीदानंतरचा अल्बम मी मराठीत करणार आहे. पहिला इंडियन आयडॉल आणि आपका अभिजीत हा तुझा अल्बम प्रचंड हिट ठरला तरी तू म्युझिक रिअ‍ॅलिटी शोच्या परीक्षकांमध्ये मात्र दिसत नाहीस याबद्दल छेडले असता अभिजीतने सांगितले की काही कॉमेडी शो मी केले. परंतु नंतर असा विचार केला की, माझी ओळख मला गायक म्हणूनच करायची आहे, त्यामुळे गाण्याकडे पूर्णवेळ लक्ष देऊन काम करायला हवे. कारण टीव्ही शो करताना खूप वेळ द्यावा लागतो. त्यापेक्षा गाण्यावरच पूर्णत: लक्ष देण्याचे ठरविले. हळूहळू सिनेसंगीताप्रमाणे गैरफिल्मी संगीतालाही चांगले दिवस येतील अशी मला आशा आहे, असे मतही त्याने व्यक्त केले.  आवडता संगीतकार कोण असे विचारले त्यावर पं. हृदयनाथ मंगेशकर आपले आवडते संगीतकार असून त्यांच्याकडे गाण्याची इच्छा आहे, असे अभिजीत सावंतने सांगितले.  ‘फरीदा’ या अल्बममध्ये माझा भाऊ अमितनेही एका गाण्याला संगीत दिले असून अमृता खानविलकरला घेऊन आम्ही व्हिडीओ बनविला आहे. लवकरच टीव्हीवरून हा व्हिडीओ पाहायला मिळेल, अशी माहिती त्याने दिली.