गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून आगामी कुंभमेळ्यापूर्वी त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, तसेच त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. त्र्यंबकेश्वर येथे गुरुवारी आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते बोलत होते. सिंहस्थ कामांवर साधु-महंतांनी प्रश्नचिन्ह निर्माण करत आंदोलनाचा इशारा दिल्यावर प्रशासन व शासकीय पातळीवर धावपळ सुरू झाली आहे. या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी वर्षांच्या पहिल्याच दिवशी बैठक घेऊन अप्रत्यक्षपणे ते सूचित केले.
यावेळी खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. निर्मला गावित, बाळासाहेब सानप, नगराध्यक्षा अपर्णा शिरसाठ, आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद महाराज, महामंत्री हरिगीरी महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा असल्याने त्याकडे सर्वाचे लक्ष होते. बैठकीचे स्थळ व तत्सम बाबींची वेगवेगळी माहिती दिली गेल्याने संभ्रम निर्माण झाला. भाजपमधील गटबाजीचे दर्शन घडले. साधु-महंतांच्या रोषाचे सावटही बैठकीवर होते. परंतु, विशेष बैठकीत दाखल झाल्यावर नाराजीचे सूर गौरवात रुपांतरीत झाले. कुंभमेळ्याच्या काळात गर्दीचे नियोजन करण्यासाठी इतर ठिकाणच्या कुंभमेळ्यातील व्यवस्थेचा अभ्यास करण्यात येईल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्याबरोबर आवश्यक तिथे आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल, असे महाजन यांनी नमूद केले. कुंभमेळ्याचे शिस्तबध्द नियोजन करताना भाविकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. कुंभमेळा पावसाळ्यात होणार असल्याने त्यादृष्टीने विचार केला जात आहे. स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊन प्रदूषण होऊ नये म्हणून विशेष उपाय योजले जातील असे ते म्हणाले.
त्र्यंबकेश्वर येथील रस्ते, आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेबाबत नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन विकास कामे केली जात आहे. कुशावर्तातील पाणी स्वच्छ राखण्यासाठीची योजना, पिण्याच्या पाण्याची सुविधा, यात्रेकरुंसाठी निवारा शेड, साधुंसाठी शेड ही कामे प्रगतीपथावर आहेत. साधु-महंत व आखाडय़ांना आवश्यक त्या सोईसुविधा पुरविल्या जातील. विकास कामे गुणवत्तापूर्ण व्हावी यावर लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. या कामांसाठी वाढीव निधीची गरज पडल्यास शासनाकडून त्याची पूर्तता केली जाईल. इतर राज्यात कुंभमेळ्यासाठी विस्तीर्ण परिसर आहे. पण, त्र्यंबकेश्वर येथे जागेची कमतरता आहे. या स्थितीत नाशिक व त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा संस्मरणीय होईल यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी त्र्यंबकेश्वरच्या विकास कामांसाठी ३२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले.
या शिवाय, त्र्यंबकला जोडणाऱ्या रस्त्याचेही रुंदीकरण केले जात आहे. ३४ कोटी रुपये खर्चून स्थापन करण्यात येणारी पाणी पुरवठा योजना १ एप्रिलपासून सुरू करण्यात येईल. कुशावर्त येथे एक तासात एक लाख लिटर पाण्याचे शुध्दीकरण करता येईल अशा क्षमतेची यंत्रणा उभारली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीआधी महाजन यांनी सपत्नीक त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा केली. देवस्थान ट्रस्टला भेट देऊन चर्चा केली.