जिल्ह्य़ात आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शहरातील बहुतेक नाल्याची सफाई आणि रस्त्यावरील खड्डे बुजविल्याचा दावा करणाऱ्या नागपूर महापालिकेचा मात्र खरा चेहरा समोर आला आहे. जून महिन्यात आलेल्या पहिल्याच पावसाने महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने शहरातील नाले आणि खड्डे बुजविण्याचे कामे हाती घेतल्यानंतर शहरातील खरे वास्तव बघता अनेक भागात पावसाळ्यापूर्वीची कामेच झाली नसल्याचे समोर आले आहे.
दरवर्षी मुसळधार पाऊस आल्यानंतर शहरातील विविध भागातील विदारक परिस्थिती बघता महापालिका प्रशासन दरवर्षी त्यावर उपाययोजना करण्यासाठी निर्देश देत असल्यामुळे साधारणत: पावसाळा सुरू होण्यापूर्वी विविध भागातील नाले सफाई आणि रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले जातात. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ९० टक्के नाले सफाईचे कामे झाल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात शनिवारी आलेल्या पावसामुळे नाल्याची सफाई झाली नसल्याचे समोर आले. नाल्याच्या काठावर असलेल्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार उघडकीस आले. नाल्या सफाईनंतर जमा केलेला गाळ उचलला गेला नसल्यामुळे तो पुन्हा पावसामुळे नाल्यात गेला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार उघडकीस आले. पावसामुळे शहरातील बहुतेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाण्याचे डबके साचले आहे. शहरातील कुठल्या भागात पाणी साचले जाते याची कल्पना असताना महापालिका प्रशासनाने मात्र कुठलेच प्रयत्न केलेले दिसत नाही आणि त्याचा नाहक त्रास जनतेला पहिल्याच पावसात झाला.
शहरातील विविध भागात सिमेंटचे रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे तर काही करण्यात आले असले तरी शहरातील ८०-८५ टक्के भागात डांबरी रस्ते आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी केली जात असल्याचा दावा महापालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सकडून करण्यात आला असला तरी पहिल्याच पावसाळ्यात मात्र हे रस्ते उखडल्याचे चित्र शहरात दिसून आले. नरेंद्रनगर पूल, लोखंडी पूल, मेडिकल चौक, अशोक चौक, मस्कासाथ, शंकरनगर चौक आदी ठिकाणी दरवर्षी पाऊस आला की पाणी साचते हे माहिती असताना गेल्या काही वर्षांत त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीच व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे यावेळीसुद्धा अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला.
दोन आठवडय़ापूर्वी ज्या भागातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले तेथील माती आणि डांबर वाहून गेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे उघडे पडले आहेत. काही रस्त्यांवर कच्च्या रस्त्यांप्रमाणे धूळ आणि माती साचलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने आयआरडीपी अंतर्गत करण्यात आलेल्या महामार्गावरची अवस्था फारच बिकट झाली आहे. मोक्षधाम स्मशानभूमीपासून अशोक चौक, भंडारा मार्ग, वर्धा मार्ग, कामठी मार्ग, काटोल मार्गावरील डांबरी रस्त्यावर काही ठिकाणी खाचा पडल्या आहेत तर काही ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवरून वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. गटारे साफ केली नाही, मेन होल्सवरील झाकणे नाही, अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा निचरा न होता गटारातील पाणी रस्त्यावर आले.
शहरातील रस्ते आणि विकास कामे पाहण्यासाठी येणाऱ्या बाहेरील लोकांनी पावसाळ्यामध्ये शहरातील काही भागात दौरे करून खरे वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तर येणाऱ्याला आपण खरंच मुख्यमंत्र्यांच्या आणि केंद्रीय मंत्र्यांच्या शहरात आलो की अजून कुठे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.