ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या स्किन बँकेसाठी (त्वचा पेढी) लागणाऱ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून त्याला लवकरात लवकर मंजुरी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य संचालकांना दिले.
रोटरी क्लब ऑफ नागपूर आणि ऑरेंज सिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात मध्य भारतातील पहिली स्किन बँक (त्वचा पेढी) स्थापन करण्यात आली आहे. स्किन बँकेकरिता लागणारी उपकरणे रोटरी क्लब देणार आहे. तर ऑरेंज सिटी रुग्णालयासाठी जागा व मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. परंतु जुलै २०१४ पासून हा प्रकल्प सरकारी अधिकाऱ्यांच्या निरीक्षणामुळे अडलेला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला भेट देऊन औपचारिकता पूर्ण करावी व त्याला मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा आहे.
सरकारी अधिकाऱ्यांना विनंती करूनही त्यांनी या प्रकल्पाला भेट दिली नाही. त्यामुळे रुग्णालयाचे संचालक डॉ. अनुप मरार आणि स्किन बँकेचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. समीर जहागिरदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना स्कीन बँकेचे काय फायदे आहेत, याची माहिती दिली. शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प सुरू होण्यास विलंब होत असल्याचेही त्यांना सांगण्यात आले.
ऑरेंज सिटी रुग्णालय, रोटरी क्लब आणि नॅशनल बर्न सेंटर यांच्यासोबत झालेल्या त्रिपक्षीय करारानुसार कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. परंतु हा प्रकल्प सुरू न झाल्याने हे प्रशिक्षित मनुष्यबळ निष्क्रिय ठरले असल्याची माहितीही याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकण्यात आली. त्यांनी लगेच आरोग्य संचालकांना बोलावून या कायदेशीर बाबी पूर्ण करून या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी, असे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशामुळे हा प्रकल्प लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.