काँग्रेस आघाडीच्या प्रचारसभेत या नेत्यांनी केलेल्या आरोपांची भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीने गंभीर दखल घेतली आहे. पालकमंत्री मधुकर पिचड यांनी नगर अर्बन बँकेवर भाष्य करताना कारखान्याचे तिप्पट झालेल्या थकीत कर्जाची आठवण ठेवावी, ते कर्ज आधी फेडावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी केले, तर आमदार अनिल राठोड यांनी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी पालकमंत्री पिचड यांच्या हस्ते झाला. या सभेत पिचड व कृषिमंत्री विखे यांनी अनुक्रमे अर्बन बँक व मनपातील कारभाराच्या अनुषंगाने जारदार टीका केली होती. त्याचे आज भाजप-शिवसेना युतीत तीव्र पडसाद उमटले.
खासदार गांधी यांनी म्हटले आहे, की पिचड यांनी अर्बन बँकेच्या कारभारावर टीका करताना अगस्ती कारखान्याला बँकेनेच कर्ज दिले याचा विसर पडलेला दिसतो. पिचड यांच्या नेतृत्वाखालील या कारखान्याला बँकेने ३ कोटी २५ रुपयांचे कर्ज दिले होते, कारखान्याने त्याची वेळेवर परतफेड न केल्याने हे कर्ज आता तिप्पट म्हणजे ३ कोटी २५ लाख रुपये झाले असून शिवाय थकीत आहे.
अर्बन बँकेच्या कारभारावर बोलताना पिचड यांना या गोष्टीचा विसर पडलेला दिसतो. अन्यथा त्यांनी हा आरोप केला नसता, कारण अर्बन बँकेचा कारभार निश्चित अगस्ती कारखान्यापेक्षा चांगला सुरू आहे. सन २००८ मध्ये बँकेच्या ठेवी ३५० कोटी रुपये होत्या. मागच्या पाच वर्षांत त्या ८५० कोटी रुपयांवर गेल्या असून ही बँकेच्या कारभारावर लोकांनी उमटवलेली विश्वासाची मोहोरच आहे. पिचड यांनी आधी त्यांच्या कारखान्याची स्थिती सुधारावी, तो नफ्यात आणावा, मगच बोलावे असे आवाहन गांधी यांनी दिले.
आमदार राठोड यांनी कृषिमंत्री विखे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राठोड यांच्या भानगडींची यादी आपल्याकडे आहे असे ते म्हणाले होते. महानगरपालिकेत पत्त्यांचा अड्डा सुरू आहे. या त्यांच्या आरोपांचा समाचार घेताना ते म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळात जिल्हय़ाचे प्रतिनिधित्व करताना विखे यांनी नगर शहरासाठी काय केले याचे आधी उत्तर द्यावे. त्यांनी शहरात एखादे तरी विकासकाम केल्याचे दाखवावे, आपण पाच हजार रुपये बक्षीस देऊ असे आव्हान राठोड यांनी दिले. तसेच २५ वर्षांच्या आमदारकीत आपण शहरासाठी काय केले, यावर आपली एकाच व्यासपीठावर समोरासमोर येण्याचीही तयारी आहे असे ते म्हणाले.