उरण तालुक्यातील केगाव दांडा समुद्रकिनाऱ्यावरील समुद्रातील वाढत जाणाऱ्या पाणी प्रदूषणामुळे दरुगधीमुळे समुद्री जीव संकटात सापडले आहेत. गेल्या चार महिन्यांत छोटय़ांसह मोठय़ा समुद्री जिवांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. सोमवारी सात ते आठ फूट लांबीचा डॉल्फीन मासा मृतावस्थेत किनाऱ्यावर आढळला आहे. गेल्या चार महिन्यांत या डॉल्फीन तीन मोठय़ा जिवांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत जीव समुद्र किनाऱ्यावर येऊ लागल्याने किनाऱ्यावरील दरुगधी वाढली असून परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उरण तालुक्यातील केगाव दांडा हे गाव आहे. या किनाऱ्यावर सोमवारी समुद्राच्या भरतीच्या लाटेत सात ते आठ फूट लांबीचा आणि एक मीटरपेक्षा अधिक गोलाई असलेला एक डॉल्फीन मासा वाहून आला होता. याची माहिती वन व मच्छ विभागाला मिळाल्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्याची पाहणी केली. डॉल्फीन मासा चार दिवसांपूर्वी मरण पावलेला असावा असा अंदाज उरण वन विभागाचे वनपाल चंद्रकांत मराठे यांनी व्यक्त केला. या माशाचे वजन शंभर किलोपेक्षा अधिक होते. या डॉल्फीनचे शवविच्छेदन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
चार महिन्यांपूर्वी पंचवीस ते तीस फूट लांबीचा देव मासा याच केगाव दांडा किनाऱ्यावर आढळून आला होता. या माशांचे दोन तुकडे झाले होते. त्याच्याच शेजारी अडीच ते तीन फूट लांबीचे समुद्री कासवही मृताव्यस्थेत आढळून आले होते. त्यानंतर डॉल्फीन आढळून आला आहे. समुद्री जीव सध्या आपला अधीवास असलेली ठिकाणे सोडून येऊ लागल्याच्या घटना अरबी समुद्रकिनाऱ्यावर घडू लागल्या आहेत. यामध्ये अलिबागमधील रेवदांडा किनाऱ्यावर आलेला जिवंत व्हेल (देव) मासा तर नागोठण्याच्या खाडीत दोन वेळा आलेला डॉल्फीन माशाच्या समावेश आहे. हे मासे जून-जुलै महिन्यात आढळले होते. समुद्री जिवांच्या वाढत्या मृत्यूच्या घटनेला समुद्रातील प्रदूषणाचे कारण असल्याची शक्यता वन विभागाचे वनपाल मराठे यांनी व्यक्त केली आहे.तसेच समुद्रातील मोठय़ा जहाजांच्या धक्क्य़ामुळेही महाकाय माशांचे अपघात होत असतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.