स्थानिक संस्था कराविरोधात ठाण्यातील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये हॉटेल व्यावसायिकही सहभागी झाल्याने त्याचा थेट फटका शहरातील मासळी बाजाराला बसू लागला आहे. लहान-मोठी सगळी हॉटेल्स गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने मासळीची विक्री कमी झाली आहे. विशेष म्हणजे, स्थानिक संस्था करामुळे मासळी बाजार बंद असेल, असा समज सर्वत्र आहे. त्यामुळे ठाण्यातील मासळी बाजारात ग्राहकांची संख्याही रोडावली आहे. त्यामुळे पापलेट, सुरमई, हलवा, कोळंबी असे महागडे मासे तुलनेने स्वस्त झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.  
ठाणे शहरासह, कळवा, मुंब्रा परिसरात ७५० हून अधिक लहान मोठी हॉटेल्स आहेत. यापैकी बहुसंख्य हॉटेल्स मांसाहारी आहेत. मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर जाऊन घाऊक दरात मासळी खरेदी करण्याकडे बडय़ा हॉटेल व्यावसायिकांचा कल दिसत असला तरी लहान उपाहारगृह चालक मात्र ठाण्यातील मासळी बाजारातून घाऊक दरात मासळी खरेदी करतात. ठाण्यात लहान उपाहारगृहांची संख्या मोठी आहे. अशा उपाहारगृहांना मासळी पुरविणाऱ्या विक्रेत्यांची संख्या ठाण्यात मोठी आहे. अनेक हॉटेल व्यावसायिक हे शहरातील स्थानिक मासळी बाजारातून माशांची खरेदी करतात. स्थानिक संस्था कराविरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये हॉटेल व्यावसायिकांचाही सहभाग असल्याने मागील काही दिवसांपासून अनेक व्यापाऱ्यांनी मासळीची खरेदी केलेली नाही. यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर अवलंबून असलेल्या मासेविक्रेत्यांचा धंदा मागील काही दिवसांपासून ठप्प झाला आहे. अनेक विक्रेत्यांनी मागील तीन-चार दिवसांपासून विकत घेतलेला माल तसाच पडून आहे. त्यातच कडक उन्हाळ्यामुळे हा माल खराब होत असल्याने तो टिकविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर कसरत करावी लागत असल्याचे महागिरी बाजारातील मोठय़ा मासळी बाजारातील विक्रेती रेखा भोईर यांनी सांगितले.
बर्फ महागला
उन्हाळ्याचे दिवस असल्याने मत्सविक्रेत्यांना नेहमीपेक्षा जास्त बर्फ  लागत आहे. त्यातच शिल्लक राहिलेला माल टिकविण्यासाठी अधिक बर्फ विकत घ्यावा लागत असल्याने बर्फावर मोठा खर्च होत आहे, अशी माहिती मत्सविक्रेत्या रेखा भोईर यांनी दिली. ठाण्यातील महागिरी मार्केटमध्ये मागील दोन दिवसांत सर्वसामान्य खरेदीदारांची संख्याही रोडावली आहे, असे अलका कोळी यांनी सांगितले. या बंदमुळे मासळी बाजारही बंद असल्याचा नागरिकांचा गैरसमज झाल्याने ग्राहक काही दिवसांपासून शहरातील प्रमुख मासळी बाजारांमध्ये फिरकलेले नाहीत. कोंबडी, बकरी आणि इतर मांसाहारी पदार्थ विकणाऱ्यांचा धंदाही काही प्रमाणात कमी झाला आहे.