मुंबई बंदराच्या मालकीच्या ससून डॉकमधील जागा खाली करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मच्छीमारांना दिल्यामुळे ससून डॉकमधील मासळीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. या आदेशाबाबत तीव्र नाराजी दर्शविण्यासाठी या ठिकाणी खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी मंगळवारी एक दिवसाचा बंद पुकारला होता. या बंदला मच्छीमार संघटनांनीही पाठिंबा दिला.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई बंदराच्या ससून डॉकमधील जागेत असलेली मासळी खरेदी-विक्रीची दुकाने बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे देशातून निर्यात होणाऱ्या तसेच देशाअंतर्गत विक्रीसाठी जाणाऱ्या मासळीच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. करंजा बंदरातील ७० ते ८० बोटी दररोज ससून डॉकमध्ये मासळी उतरवीत आहेत. यामध्ये प्रत्येक बोटीत दीड ते दोन लाखांची निर्यातक्षम मासळी असते. बंदरात दररोज मासळीची खरेदी-विक्री करण्यासाठी पंधराशेपेक्षा अधिक बोटी येत असतात. दुकाने बंद झाल्यास कोटय़वधींचे नुकसान होण्याची भीती मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.
या मासळीची खरेदी न झाल्यास मच्छीमारांचे नुकसान होणार आहे. या आदेशाबाबत तीव्र नाराजी प्रकट करण्यासाठी मासळी खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी मंगळवारी मासळी खरेदी-विक्री बंद आंदोलन पुकारले होते. शासनाने या संदर्भात योग्य तो निर्णय न घेतल्यास बेमुदत बंदचाही इशारा दिला आहे. या आदेशामुळे खोल समुद्रात मासेमारी करून मासळीची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेकडो मासेमारी बोटींवरील मासळीचे नुकसान होण्याची शक्यता मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी वर्तविली आहे. या समस्येवर लवकरात लवकर उपाय योजना करावी, अशी मागणी नाखवा यांनी शासनाकडे केली आहे.