मासळी पकडायला उत्साहानं जावं, रात्रभर जाळं लावावं आणि सकाळी जड झालेलं जाळं मोठय़ा अपेक्षेने खेचावं तर.. त्यातून निघतं काय? प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा! वातावरणातील बदल, समुद्रातील प्रदूषण, पावसाळ्यातील मासेमारीबंदी, मोठमोठय़ा ट्रॉलरच्या मदतीने होणारी घाऊक मासेमारी या साऱ्या संकटांचा सामना करीत मासेमारी करणाऱ्या छोटय़ा मच्छिमार बोटी या नव्या समस्येमुळे जणू गाळातच रुतू लागल्या आहेत.गेली अनेक वर्षे मासळीच्या दुष्काळाने दर्याचा राजा मच्छिमार त्रस्त आहे. विशेषत: छोटय़ा मच्छिमारांवर याचा जास्त परिणाम झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे तसेच शासनाच्या धोरणांमुळेही त्यात आणखी वाढ झाली आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करून बांधलेल्या मच्छिमार बोटीतून मासेमारी करण्यासाठी मेहनतीने करंजा तसेच रेवस परिसरात मच्छिमारीसाठी जाळे टाकून दोन ते तीन तासांनंतर ही जाळी ओढल्यानंतर जाळ्यात मासळीऐवजी प्लास्टिकच्या पिशव्या तसेच कचराच हाती लागत आहे. वातावरणात सातत्याने होणारे बदल, पावसाळी मासेमारीवरील बंदी, वाढती महागाई, डिझेलच्या दरातील वाढ तसेच व्यवसायातील स्पर्धा व मजुरांची वाढती मजुरी, यातच मासळीची घटती संख्या यामुळे मच्छिमार हवालदिल झाला आहे. त्यातच आता उरण तसेच मुंबई परिसरातील औद्योगीकरणाचाही परिणाम जाणवू लागला आहे. उरणच्या ओएनजीसीमधून समुद्रातून मुंबईत जाणाऱ्या तेलवाहिन्या, जेएनपीटी बंदरातून ये-जा करणाऱ्या महाकाय जहाजांतून टाकला जाणारा कचरा, जहाजामाग्रे आयात करण्यात येणारे रासायनिक व ज्वलनशील पदार्थ यांचे पाण्यावर होणारे परिणाम, यामुळे समुद्रातील प्रदूषणातही वाढ झालेली आहे.
पाच वर्षांपूर्वी जेएनपीटी व मुंबई बंदरादरम्यान चित्रा व खलिजा या दोन महाकाय जहाजांत झालेल्या टकरीमुळे तेलगळती झाल्याने मुंबईपासून रत्नागिरीपर्यंतच्या किनाऱ्यावर तेलाचे तवंग पसरल्याने मासळीची मागणीही कमी झाली होती. या संकटातून अजूनही मच्छिमार सावरलेले नसताना समुद्रातील प्रदूषणात वाढ होतच आहे. त्यातच आता शहरातून तसेच गावागावांतून वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या तसेच नष्ट न होणाऱ्या इतर वस्तूंची विल्हेवाट न लावताच त्या समुद्रात टाकल्या जात आहेत. विशेषत: प्लास्टिकच्या पिशव्यांची यामध्ये मोठी संख्या आहे. समुद्रात कचरा म्हणून  टाकण्यात येणाऱ्या या वस्तू नष्ट होत नसल्याने मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींच्या जाळ्यात या वस्तू सापडत आहेत. जाळ्यांत मासळीपेक्षा प्लास्टिकच्या वस्तूच जास्त येत असल्याने मच्छिमारांवर आगीतून फुफाटय़ात जाण्याची वेळ आली आहे.

भस्मासुर!
प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरायला सोप्या असल्या तरी जैव साखळीसाठी त्या जीवघेण्या ठरत आहेत. प्रक्रिया न करता कचऱ्यात टाकलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून टाकलेले काही खाद्य खाताना हजारो गायी, म्हशी, बैल, शेळ्या, गाढवे, कुत्री गंभीर आजारी पडली आहेत अथवा प्राणासही मुकली आहे. जव्हारसारख्या दुर्गम तालुक्यात एक बैल मेल्यानंतर त्याला गावाबाहेर एका खड्डय़ात टाकले गेले. अनेक दिवसांनंतर गिधाडे आणि कोल्ह्याकुत्र्यांनी त्या बैलाचे मांस खाऊन टाकल्यानंतर त्याच्या छातीच्या पिंजऱ्यात गावकऱ्यांना प्लॅस्टिकचा भलाथोरला गोळा आढळून आला. चांगला धडधाकट बैल मरण्याचे कारण तेव्हा गावकऱ्यांच्या ध्यानात आले.