उरण तालुक्यात बहुतांश भाग हा शेतीवर अवलंबून होता. शेतीशिवाय स्थानिक नैसर्गिक नाल्यात समुद्रातून येणाऱ्या मासेमारी हा जोडव्यवसायही महत्त्वाचा होता. मात्र या परिसरातील उद्योगांमुळे वाढलेल्या प्रदूषण व राजरोसपणे सुरू असलेल्या नैसर्गिक नाल्यांवरील मातीच्या भरावामुळे नैसर्गिक नाले बंद झाल्याने समुद्रातून येणाऱ्या मासळीचे प्रमाण घटल्याने या परिसरातील पारंपरिक मासेमारीवर अवलंबून असलेल्या शेकडो मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आलेले आहे. याची सुरुवात पहिल्या पावसात येणाऱ्या आगोटीच्या चिवण्याची संख्या घटल्याने झाली आहे.
उरणमधील शेतकऱ्यांसाठी तसेच समुद्र व खाडीकिनाऱ्यावर वास्तव्य करणाऱ्यांसाठी मान्सूनच्या पहिल्या पावसाची ओढ लागलेली असते. या पहिल्या पावसातच त्यांना आवडणाऱ्या शिंगाली या माशाचा छोटा अवतार असलेला चिवणा मोठय़ा संख्येने मासेमारीत सापडतो. पहिल्या पावसात येणाऱ्या या माशांच्या विक्रीतून येथील पारंपरिक मच्छीमाराला चांगला फायदा होतो. त्याचप्रमाणे खवय्यांनाही चिवण्यांच्या आगमनाची आस लागलेली असते. चवीला रुचकर असणाऱ्या या चिवण्यांचे पारंपरिक पद्धतीचे कालवण ही एक मेजवाणीच असते. अगदी अल्प कालावधीत मोठय़ा संख्येने मिळणारा हा मासा थेट समुद्रातून भरतीच्या वेळी खाडीकिनारी येत असल्याने खाडीमध्ये याचे प्रमाण अधिक असते. मात्र सध्या उरण परिसरात सुरू असलेल्या मातीच्या भरावामुळे या परिसरातील गावातील शेतीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी शेकडो वर्षांपूर्वीचे असलेले नैसर्गिक नाले मातीचा भराव टाकून बुजविले जात आहेत. त्याच प्रमाणे जेएनपीटी बंदर परिसरात हाताळण्यात येणाऱ्या रासायनिक पदार्थ तसेच तेलाच्या तवंगामुळे होणाऱ्या प्रदूषणाचाही परिणाम सध्या या माशांची संख्या घटण्यावर झाला आहे. उरण तालुक्यात यापूर्वी खाडीतील हजारो मासे मेल्याच्याही घटना घडलेल्या असल्याने खाडीकिनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.