माहूरचे नगराध्यक्ष समर त्रिपाठी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ नगरसेवक काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे समजते. आठवडाभरात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून हे नगरसेवक अध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नांदेड जिल्ह्य़ात अर्धापूर व माहूर येथे नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली. ग्रामपंचायत बरखास्त करून नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. माहूर नगरपंचायतीत राष्ट्रवादीने सर्वाधिक ८ जागा मिळवल्या. १७ पैकी ८ जागा मिळाल्याने राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाली.
काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी ४ जागा, तर एका जागेवर अपक्षाने विजय मिळवला होता. आमदार नाईक यांनी अध्यक्षपदी समर त्रिपाठी यांची वर्णी लावली. अध्यक्ष समर त्रिपाठी यांच्या मनमानी कारभाराने अनेक नगरसेवक नाराज होते.
पक्षाच्या काही नगरसेवकांनी ही नाराजी आमदार नाईक यांच्या कानी घातल्यानंतर त्याचा फारसा उपयोग झाला नाही. हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या दुर्गाप्रताप चंदेल, कल्पना मडावी,    सुशीला राठोड, नूरजहाँ पठाण व लीलाबाई राठोड या ५ नगरसेविका    काँग्रेसमध्ये  जाण्याच्या मन:स्थितीत आहेत.
राष्ट्रवादीमधील असंतोषाचा फायदा घेत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी या नगरसेवकांना आपल्या तंबूत घेण्याची तयारी पूर्ण केली आहे. लवकरच या नगरसेवकांचा प्रवेश सोहळा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादीच्या ५ नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेसचे संख्याबळ नऊ होईल. पण अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी त्यांना शिवसेनेच्या नगरसेवकांची गरज लागेल हे निश्चित. राष्ट्रवादीच्या ‘त्या’ ५ नगरसेवकांमुळे आपोआपच शिवसेना नगरसेवकांचे महत्त्वही वाढले आहे. पक्ष प्रवेशाच्या या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाल नसला, तरी हा पक्ष प्रवेश निश्चित असल्याचे मानले जाते.