वरूड व अंजनगाव सुर्जीत या दोन तालुक्यात शनिवारी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान झालेल्या वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये ५ ठार, तर २ जण गंभीर जखमी झाले. यापैकी वरूड तालुक्यात राजुराबाजारजवळ ऑटो व टाटा सुमोच्या झालेल्या धडकेत तीन जण ठार, एक जण जखमी, तर अंजनगाव तालुक्यात आकोट मार्गावर झालेल्या ट्रक व मोटरसायकलच्या धडकेत दोन जण ठार व एक जण गंभीर जखमी झाला.
वरूड तालुक्यातील राजुराबाजार येथील मिरची मार्केटजवळच वडाळा फाटय़ासमोर मिनीडोअर व टाटा सुमोची समोरासमोर धडक झाली. ही घटना १६ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. शेतकऱ्यांचे मिरचीचे पोते घेऊन जाणारा ऑटो राजुराबाजार येथे जात असताना समोरून चिंचरगव्हाण येथील टाटा सुमो प्रवासी घेऊन आष्टीकडे जात होती. या सुमोची मिनिडोअरला धडक लागली. त्यात मिनिडोअर चकनाचूर झाला. मिनिडोअरचा चालक नितीन उत्तमराव गुल्हाने (२५), नाना उर्फ मनोहर श्रीराम बोबडे (५५), तसेच २५ वर्षीय प्रशांत नारायण घोटकर अपघातात ठार झाले, तर २१ वर्षीय आदित्य मनोहर भोरे गंभीर जखमी झाला. चौघेही वर्धा जिल्ह्य़ातल्या आष्टी तालुक्यातील साहुर येथील आहेत. घटनेची माहिती मिळताच वरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर बननोटे, जमादार दीपक काळे, लक्ष्मण साने, संदीप लेकुरवाळे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, एका व्यक्तीचा उपचारापूर्वी तर  आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान, तर प्रशांत नारायण घोटकर यांचा नागपूरला नेत असताना वाटेत मत्यू झाला.अंजनगाव तालुक्यात अंजनगाववरून संत्र्यांनी भरलेला ट्रक आकोटकडे जात असताना सातेगावकडून अंजनगावकरिता काही कामानिमित्त तीन युवक मोटरसायकलने निघाले होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि  मोटारसायकलची जोरदार धडक झाल्याने मोटरसायकलवरील ३० वर्षीय सतीश पांडुरंग कावरे हे जखमी झाले. घटनास्थळावरून भंडारज येथे जात असलेले रवींद्र मधुकर दिपटे यांनी याबाबतची माहिती सातेगाव फाटय़ावरील सामाजिक कार्यकर्त्यांना दिली. त्याचवेळी फरार होण्याच्या बेतात असलेला ट्रक सामाजिक कार्यकर्त्यांनी अडविला. भंडारज पं. स. चे सदस्य प्रदीप निमकाळे, श्रीकांत घटाळे, बाळासाहेब काळमेघ, प्रमोद दाळू, अमोल काळमेघ, घटाटे, लवकेश शेळके, अनिल अलोकार, गुलाबराव वाहुरवाघ, किशोर दिपटे, पळसकर आदींनी घटनास्थळावरून रुग्णालयापर्यंत मदत कार्य केले.