पुलावरून जाणारी शालेय बस नाल्यात कोसळून पाच शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. नाला फार खोल नसल्याने सुदैवाने प्राणहानी टळली. नागरिकांनी घटनास्थळी दिलेल्या माहितीनुसार, कुंदनलाल गुप्ता नगरातील महालक्ष्मी विद्यालयाला मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास सुटी झाली. तेथील विद्यार्थ्यांना घेऊन झुलेलाल इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजीची मिनी बस (एमएच/३१/सीक्यू/१४८६) निघाली. ही बस वनदेवीनगरातून वांजराकडे निघाली. नाल्यावरून बस जात होती. येथे रस्ता खोलगट आहे. नाल्यावरून जाताना समोर चढाव आहे. चढाव चढत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस मागे आली आणि थेट नाल्यात कोसळली. रस्त्यापासून नाला पाच ते सहा फुट खोल असल्याने बसचा मागील भाग नाल्यात जमिनीला टेकला. बसचा वरील भाग उंच गेला. या अपघातामुळे बसमधील विद्यार्थी मागच्या भागाला खाली एकमेकांवर आपटले. विद्यार्थी घाबरले आणि किंचाळू लागले. अपघात झाल्याचे दिसताच या परिसरातील लोक धावले.
अपघातस्थळी गर्दी झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब देवलकर यांच्यासह यशोधरा नगर पोलीस तेथे पोहोचले. बसमध्ये सुमारे ३१ विद्यार्थी होते. घाबरलेले विद्यार्थी किंचाळत होते. नागरिक त्यांना धीर देत होते. बसमध्ये चढून विद्यार्थ्यांना धीर देत महत्प्रयासाने बाहेर काढले. किरकोळ जखमी विद्यार्थ्यांस जवळच्या रुग्णालयात नेऊन किरकोळ उपचार करण्यात आले. अपघात झाल्यानंतर बस चालक घटनास्थळाहून पळून गेला. पोलिसांनी क्रेन बोलावून बसला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बस ओढताना तिची मागील चाके पुलाच्या स्लॅबला अडकल्याने दोर तुटला. बऱ्याच वेळाने बस बाहेर काढण्यात आली. या परिसरात लोकवस्ती झाली तरी नाल्यावर केवळ रपटा आहे. कठडे नाहीत. पावसाळ्यात येथे पूर येऊन हा रस्ता बंद होतो. येथे उंच पूल बांधावा, अशी नागरिकांची जुनीच मागणी आहे. या घटनेनंतर तरी पूल बांधणार काय, असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी केला.