लाखाचे बारा हजार..!
मराठी चित्रपटसृष्टीत आजवर कधीही न घडलेली गोष्ट गेल्या शुक्रवारी घडली खरी. या शुक्रवारी एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल ५ चित्रपट प्रदर्शित झाले. पण असे झाल्यावर व्हायचे तेच झाले. कोणाचाच धंदा नीट झाला नाही. एरवी मराठी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याचा जमाना आहे. पण एकाच वेळी ५ चित्रपट आल्याने कोणाचाच धंदा नीट झाला नाही. एकगठ्ठा चित्रपट प्रदर्शित करण्याचा हा ‘वेडेपणा’ प्रत्येक चित्रपटासाठी घातक ठरल्याचे दिसून येत आहे. १२ कोटींच्या आसपास गुंतवणूक असलेल्या या चित्रपटांनी एकत्रितपणे जेमतेम दोन कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे. आपल्याबरोबरच आणखी चार चित्रपट प्रदर्शित झाल्याने आपल्या चित्रपटाचे नुकसान झाल्याचे निर्माते खासगीत मान्य करत आहेत.आयपीएलच्या हंगामामुळे नगण्य असलेले हिंदी चित्रपटांचे प्रमाण, शाळेला लागलेल्या सुट्टय़ा आणि रामनवमी असा त्रिवेणी योग साधत १९ एप्रिल रोजी ‘येडा’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं!?’, ‘चिंटू-२’, ‘टूरिंग टॉकिज’ आणि ‘कुरुक्षेत्र’ हे पाच चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांची एकत्रित गुंतवणूक १२ कोटींच्या आसपास होती. हा प्रत्येक चित्रपट वेगळ्या विषयावर असल्याने प्रेक्षकांची विभागणी होणे साहजिक होते.
’  नुकसान टाळता आले असते!
एकाच दिवशी पाच चित्रपट प्रदर्शित करण्यामुळे पाचही चित्रपटांचे नुकसान झाले आहे. वास्तविक प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे. मात्र प्रेक्षकांना दोनच पर्याय उपलब्ध असते, तर कदाचित दोन्ही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला असता. इतर चार चित्रपटांना मिळालेल्या प्रेक्षकांपैकी किमान ५० टक्के प्रेक्षक तरी पाचव्या चित्रपटाकडे वळले असते. पण त्यासाठी निर्मात्यांनी समन्वय आणि समजूतदारपणा दाखवण्याची गरज होती. राजकारणात जास्त उमेदवार असले, तर दोन समान विचारप्रणालीच्या उमेदवारांच्या मतांमध्ये विभाजन होऊन त्याचा फायदा तिसऱ्यालाच होतो. मात्र येथे फायदा कोणाचाच झाला नाही.
    समीर दीक्षित (चित्रपट वितरक)

*  हा निव्वळ अपघात!
आम्ही निर्माते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असतो. पण तरीही प्रत्येक निर्मात्याचा विचार असतो. त्याचे तर्कशास्त्र असते. प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी एकमेकांशी चर्चा केली होती. मात्र प्रत्येकाचीच काहीतरी गणिते असल्याने कोणालाही आपला चित्रपट पुढे किंवा मागे ढकलणे शक्य झाले नाही. तरीही समन्वय झाला असता, तर नक्कीच फायदा झाला असता. मात्र एकाच दिवशी पाच चित्रपट प्रदर्शित होणे हा निव्वळ अपघात आहे. एकाच चौकात पाच गाडय़ा एकत्र आल्या, तर सिग्नल प्रणालीही फार काही करू शकत नाही. पण पुढील वेळी हा अपघात टाळण्याचा प्रयत्न आम्ही निर्माते नक्कीच करू!
    श्रीरंग गोडबोले (निर्माता, चिंटू-२)

चित्रपट            गुंतवणूक (कोटींमध्ये)     कमाई* (लाखांमध्ये)

येडा                        २.४०                                ३५
प्रेम म्हणजे..          २.४०                                ७०
टूरिंग टॉकीज           ३                                    १५
चिंटू-२                   २.४५                                ४०
कुरुक्षेत्र                  १.३०                                  ०८
*(ही कमाई बुधवार पर्यंतची आहे)