दूरध्वनीचा शोध लावणाऱ्या ग्रॅहम बेल यांना मरणोत्तर ‘डिलीट’ दिली तरी त्यांनी करून ठेवलेल्या कार्याच्या ऋणातून मुंबई विद्यापीठाला मुक्त होता येणार नाही. कारण, केवळ परीक्षेदरम्यान होणारे गोंधळ सावरायलाच नव्हे तर पेपर सेटर्सच्या विसराळूपणामुळे प्रश्नपत्रिकेत राहून गेलेले प्रश्न ‘डिक्टेट’ करून परीक्षा मार्गी लावण्यातही विद्यापीठाला दूरध्वनीचा मोठा उपयोग होऊ लागला आहे.
त्याचे झाले असे.. विद्यापीठाची फ्रेंच या विषयाची ‘तृतीय वर्ष पदवी’ (बीए) अभ्यासक्रमाची परीक्षा गुरुवारी काही निवडक केंद्रांवर पार पाडली. त्यापैकी एक केंद्र होते माटुंग्याचे रुईया महाविद्यालय. या ठिकाणी इनमीन २० विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. पेपर होता ‘ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम’चा. १०० गुणांचा हा पेपर लिहिता-लिहिता विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, पाच गुणांचा एक प्रश्नच प्रश्नपत्रिकेतून ‘गायब’ आहे. उत्तरपत्रिका तशीच परत करायची तर पेपर तपासण्याआधीच पाच गुणांवर पाणी. म्हणून घाबऱ्याघुबऱ्या झालेल्या विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांना प्रश्नपत्रिकेतील घोळ लक्षात आणून दिला.पर्यवेक्षकांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधून प्रश्नपत्रिकेत एक प्रश्नच नसल्याचे लक्षात आणून दिले. त्यानंतर विद्यापीठाच्या कलिना येथील परीक्षा विभागातील सूत्रे हलली आणि पाच गुणांचा एक प्रश्न दूरध्वनीवरूनच पर्यवेक्षकांना ‘डिक्टेट’ करण्यात आला. गंमत अशी की प्रश्न फ्रेंचमध्ये असल्याने पर्यवेक्षकांना तो समजेना. म्हणून एका विद्यार्थिनीनेच तो प्रश्न दूरध्वनीवर समजून घेतला आणि आपल्या इतर सहकारी परीक्षार्थीना सांगितला. त्यानंतर परीक्षा पार पडली, असे एका परीक्षार्थी विद्यार्थिनीच्या पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.पेपर सेटरच्या विसराळूपणामुळे घडलेल्या या घोळामुळे विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेच्या दिवशी नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले. ही विद्यापीठाची परीक्षा होती. पण, या परीक्षेबाबत विद्यापीठ किती गंभीर आहे, हेच या प्रकारावरून लक्षात येते, अशी संतापजनक प्रतिक्रिया या पालकाने व्यक्त केली. याबाबत परीक्षा विभागाचे नियंत्रक दीपक वसावे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.