News Flash

नगराध्यक्षांच्या पतीसह पाच जणांची माजी नगराध्यक्षास बेदम मारहाण

राज्याच्या वेगवेगळ्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची गुंडशाही समोर येत असतानाच मंगळवारी उमरीचे माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला. एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे

| April 3, 2013 02:31 am

राज्याच्या वेगवेगळ्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची गुंडशाही समोर येत असतानाच मंगळवारी उमरीचे माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला. एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे भरदुपारी झालेल्या या हल्ल्यात कुलकर्णी गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही.
उमरी पालिकेवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी विद्यमान नगराध्यक्षा अनिता अनंतवार यांनी मिनुसाब सूतगिरणीजवळ केलेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. अनधिकृत बांधकाम प्रकरणी अनंतवार यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीही झाली. मंगळवारी अंतिम सुनावणी होती. या साठी कुलकर्णी व त्यांचे सहकारी एम. एम. चंदापुरे खासगी गाडीने नांदेडला निघाले होते. दुपारी २ वाजता उमरी तहसीलसमोरून ते जात असताना नगराध्यक्षांचे पती व उमरी पालिकेचा प्रभारी अधीक्षक श्रीनिवास अनंतवार आपल्या चार सहकाऱ्यांसह तेथे पोहोचला. कुलकर्णी यांची गाडी अडवून त्याने चालकाला बाजूला केले व त्यांच्या वाहनाची तोडफोड करत हॉकी स्टीक, काठी, लोखंडी सळईने कुलकर्णी यांना बेदम मारहाण करण्यात आली. अनंतवार याने कत्ती घेऊन ये, असे आपल्या समर्थकाला सांगताच जखमी अवस्थेत कुलकर्णी यांनी उमरीच्या न्यायालयात धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत कुलकर्णी न्यायालयात पोहोचले. न्यायाधीशांसमोर त्यांनी ‘साहेब जीव वाचवा’, असे साकडे घातले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन न्या. व्ही. डी. पाटील यांनी कुलकर्णी यांना पोलीस संरक्षणात रुग्णालयात नेण्याचे आदेश दिले.
उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर कुलकर्णी यांना नांदेडच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हात-पायाला फ्रॅक्चर, शरीराच्या वेगवेगळ्या भागावर बेदम मारहाण झाली. कुलकर्णी यांची प्रकृती चिंताजनक असली, तरी धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. घटनेचे वृत्त कळताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, जि.प. सदस्य स्वप्नील चव्हाण, केदार पाटील साळुंके, विठ्ठल पावडे यांच्यासह पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी धाव घेतली.
एखाद्या हल्लाप्रकरणात जखमीने न्यायालयात धाव घेऊन मदतीसाठी साकडे घालण्याची जिल्ह्य़ातील ही पहिलीच घटना मानली जाते. १९८० ते ९० या कालावधीत उमरी व गोरठा परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण असताना स्वकर्तृत्वाने व मोठय़ा धाडसाने स्वबळावर स्वत:चे साम्राज्य उभे करून सामान्य नागरिकांना दिलासा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याचा काँग्रेसने तीव्र निषेध केला.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी राज्याच्या वेगवेगळ्या भागात आपल्या गुंडशाहीचे प्रदर्शन करीत असताना नांदेडमध्येही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संस्कृतीची जोपासना करीत केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध होत असला, तरी राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या नांदेड पोलिसांनी मात्र एकाही आरोपीला अटक करण्याचे धाडस दाखवले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:31 am

Web Title: five suspect and husband of mayor beating the formar mayor
टॅग : Court,Mayor,Ncp
Next Stories
1 ‘लाल मातीतील कुस्तीला समाजानेच प्रोत्साहन द्यावे’
2 पाथरीत ९ लाखांचा गुटखा जप्त
3 कैद्यांना आठवडय़ातून दोनदाच मिळते स्नान!
Just Now!
X