उरण तालुक्यात पाणजे व दास्तान या दोन खाडय़ांत दर वर्षी हजारो मैलांचा प्रवास करीत परदेशी फ्लेमिंगो जातीचे पक्षी येत असून या वर्षी वेळेपूर्वीच या परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. सध्या जागतिक वातावरणातील बदलामुळेच काही ठिकाणी परदेशी पक्षी वर्षभर मुक्काम करू लागले असल्याचेही चित्र निर्माण झाले आहे.  सैबेरिया, रशिया तसेच इतर देशांतील वातावरणाचा परिणाम होत असल्याने दर वर्षी भारतात या प्रदेशातील विविध जातींचे पक्षी वातावरणातील बदलासाठी येत असतात. यामध्ये खासकरून विविध जातींच्या फ्लेमिंगोंची संख्या मोठी आहे. या सुंदर पक्ष्याची अनेक वैशिष्टय़े आहेत, त्यामुळे त्यांचा अभ्यास करण्यासाठी देशातील अनेक पक्षी मुंबईसह उरण परिसरात येतात. उरण हे खाडीकिनारी असल्याने समुद्रातून खाडीत असलेल्या कांदळवन परिसरात आढळणारे छोटे मासे, किडे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे चिखलामध्ये आढळणारे लहान जीव हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. त्याच्या शोधात हे पक्षी या परिसरात अनेक महिने वास्तव्य करतात. यांपैकी काही पक्षी नवी मुंबईतील पामबीच मार्गालगत असलेल्या खाडीकिनाऱ्यावरही आढळतात. उरण परिसरातील जेएनपीटी बंदर व पाणजे खाडी तसेच उरण-पनवेल राज्य महामार्गाजवळील दास्तान फाटा येथील खाडीत हे पक्षी आपले अन्न शोधत तासन् तास रांगत असतात. त्यांच्या हालचाली, मुद्रा टिपण्यासाठी सुट्टीच्या दिवशी अनेक पक्षी-प्रेमीही या परिसरात येतात. या परदेशी पाहुण्याचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाकडूनही प्रयत्न केले जात आहेत. वेळेपूर्वी फ्लेमिंगोंचे आगमन झाल्याने आनंद झाल्याचे मत पक्षी-प्रेमी मनोज ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. फ्लेमिंगोंसाठी उरणमधील पाणथळी संरक्षित करण्याचीही मागणी त्यांनी या वेळी केली आहे.