कडाक्याच्या थंडीने उत्तर भारत गारठला असला तरी मुंबईकर मात्र गुलाबी थंडीच्या आगमनाने सुखावले आहेत. उत्तरेहून येत असलेल्या थंडीच्या लाटेसोबतच दरवर्षीचे पाहुणेही शिवडीच्या किनाऱ्यावर जमायला सुरुवात झाली आहे. उंच पायांच्या, गडद गुलाबी पंखांच्या फ्लेिमगोंची पहिली तुकडी शिवडीच्या किनाऱ्यावर उतरली आहे.
शिवडीची खाडी ही रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे आवडते वसतिस्थान. लांबच लांब खाडीकिनारा, खारफुटीचे जंगल, खाण्यासाठी विपुल साठा आणि तुलनेने शांत ठिकाण यामुळे शिवडीच्या किनाऱ्यावर दरवर्षी हजारो पक्षी वस्तीसाठी येतात. यातील बहुतांश पक्षी हे गुजरात राज्यातील कच्छमधून येत असावेत, असे पक्षीतज्ज्ञांना वाटते. कच्छमध्ये पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी हे पक्षी दक्षिणेला स्थलांतरीत होतात आणि पावसापूर्वी विणीच्या हंगामासाठी मूळ ठिकाणी परततात. साधारण दिवाळीनंतर मुंबईत पक्षी येण्यास सुरुवात होते. यावर्षी मात्र थंडी उशीरा सुरू झाल्याने पक्ष्यांचे आगमनही लांबले. मात्र आता पक्षी येण्यास सुरुवात झाल्याने शिवडी-माहुलचा किनारा पांढऱ्या- गुलाबी रंगाने सजायला लागला आहे.
शिवडीच्या किनाऱ्यावर येत असलेल्या रोहित पक्ष्यांना पाहण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून दरवर्षी फ्लेमिंगो फेस्टिव्हल आयोजित केला जातो. साधारण मार्च किंवा एप्रिलमध्ये रविवारी पूर्ण दिवस हा महोत्सव असतो. पण त्यापूर्वी रोहीत पक्ष्यांना पाहण्यासाठी १६ फेब्रुवारी व २३ फेब्रुवारी रोजी बीएनएचएसकडून कार्यक्रम आखण्यात आला आहे, असे जनसंपर्क अधिकारी अतुल साठय़े यांनी सांगितले.