हजारो मैलांचा प्रवास करून मुंबई, नवी मुंबई तसेच उरण परिसरात येणाऱ्या परदेशी पक्ष्यांची सुरक्षा ऐरणीवर आली असून उरणमधील डोंगरी परिसरात दोन फ्लेमिंगो जखमी अवस्थेत आढळले असून वन विभाग तसेच पक्षीप्रेमींकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी एका फ्लेमिंगोला गंभीर जखमा झाल्याने तो भविष्यात अवकाशात झेप घेऊ शकेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
उरणमधील पाणजे तसेच डोंगरी परिसरात दररोज हजारोंच्या संख्येने विविध जातींचे देशी-विदेशी पक्षी येत आहेत. यामध्ये फ्लेमिंगो जातीच्या पक्ष्यांची संख्या अधिक आहे. यातील दोन पक्षी जखमी अवस्थेत डोंगरी ग्रामस्थांना आढळले असता त्यांनी पक्षीप्रेमींशी संपर्क साधून हे पक्षी त्यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पक्षीप्रेमींनी जखमी पक्ष्यांची माहिती उरणच्या वन संरक्षण विभागाला देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी करून घेत उपचार सुरू केले आहेत. यापैकी एका पक्ष्याच्या डाव्या पंखाला गंभीर जखमा झाल्या असून त्याच्या जखमा बऱ्या होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. तसेच हा जखमी पक्षी भविष्यात आकाशात उडण्याचीही शक्यता कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या पक्ष्याच्या पंखांना अतिउच्च दाबाच्या तारांचा धक्का लागला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. यापूर्वी उरणच्या याच परिसरात फ्लेमिंगोंची शिकार झाल्याची घटना घडली आहे. तर अनेक ठिकाणी या पक्ष्यांचे अवशेष आढळून आल्याने या पक्ष्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे या परदेशी पक्ष्यांच्या संरक्षणाची उपाययोजना आखण्याची मागणी चिरनेर येथील पक्षीप्रेमी जयवंत ठाकूर यांनी केली आहे.