जिल्ह्य़ात १४ व १५ जूनला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व जमिनीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी १९ जूनला जिल्हा काँग्रेस समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर २७ जूनला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन वाशीम जिल्ह्य़ातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन दिले.
जिल्ह्य़ात १४ व १५ जूनला झालेल्या अतिवृष्टीने नदी-नाल्याजवळ असलेल्या व पूरप्रवण क्षेत्रातील जमिनी खरडून गेल्या आहेत. त्या जमिनी किमान तीन वर्षांसाठी निकामी झाल्याने शेतकऱ्यांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंगरुळपीर, मानोरा आणि कारंजा (लाड) तालुक्यात अतिवृष्टीने नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक नागरिक बेघर झाले आहेत. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबईत भेट घेऊन जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या व्यथांबाबत सविस्तर चर्चा केली. काँग्रेस समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात अतिवृष्टीने होणाऱ्या पिकांची नुकसान भरपाई ३० हजार रुपये प्रती हेक्टरप्रमाणे द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीची दुरुस्ती करण्यासाठी प्रती हेक्टरी ७५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीच्या किमतीपोटी प्रती हेक्टरी २ लाख ५० हजार रुपये शासनाने मदत द्यावी, घरांच्या दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य करावे, या मागण्यांसह इतर मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने आपत्तीग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईवर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याची माहिती अ‍ॅड. दिलीप सरनाईक यांनी दिली.