वाहतूक कोंडी, वाहनतळाचा अभाव आणि गर्दी अशा कोंडीत सापडलेला सरकारवाडा परिसरातील पेशवेकालीन फुलबाजार शुक्रवारी गणेशवाडी येथील मार्केटमध्ये स्थलांतरित होण्याचा श्रीगणेशा झाला खरा, मात्र कित्येकांनी फुलबाजारात ठाण मांडल्याने ही प्रक्रिया पूर्णत्वास न गेल्याचे पाहावयास मिळाले. पालिकेच्या निर्णयाचे सराफ बाजाराने स्वागत केले असले तरी गणेशवाडीतील संकुलात विक्रीसाठी कायमस्वरूपी जागा न मिळाल्यास आम्ही पुन्हा फुलबाजारात व्यवसाय करू, असा इशारा विक्रेत्यांनी दिला आहे.
सरकारवाडा परिसरात सराफ बाजारासह, फुलबाजार व भाजीबाजार आहे. जवळच गोदाकाठ असल्याने या ठिकाणी भाविक, पर्यटक आणि नागरिक यांची चांगलीच वर्दळ असते. विशेषत: सकाळ व संध्याकाळी पूजा साहित्य वा भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. या एकूणच स्थितीमुळे हा परिसर नेहमीच वाहतूक कोंडीच्या गराडय़ात सापडलेला असतो. सराफ व्यावसायिक संघटनेने फुलबाजार स्थलांतरित करण्यासाठी वारंवार निवेदने दिली. मात्र त्यावर काही तोडगा निघू शकला नव्हता. पहिल्या पावसात सराफ बाजारात पाणी तुंबल्याने फुलविक्रेत्यांच्या अतिक्रमणाच्या प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले. त्या वेळी महापौर यतीन वाघ आणि नगरसेविका सुरेखा भोसले यांनी या भागाचे सर्वेक्षण करून फुलविक्रेत्यांना गणेशवाडी संकुलात कायमस्वरूपी स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला. अल्प शुल्कात जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. पालिकेचे दबावतंत्र व सराफ व्यावसायिकांचा ससेमिरा चुकविण्यासाठी काही फुलविक्रेते शुक्रवारपासून गणेशवाडी येथे स्थलांतरित होण्यास सुरुवात झाली; परंतु त्यांची संख्या अतिशय तुरळक होती. कित्येक विक्रेत्यांनी फुलबाजारात आपले व्यवसाय सुरू ठेवले होते.
पालिकेच्या या निर्णयाचे स्वागत करत सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर यांनी स्थलांतरित होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद केले. यामुळे विक्रेत्यांवर अतिक्रमणाची टांगती तलवार राहणार नाही. नक्षत्र ज्वेलर्सचे प्रसाद आडगांवकर यांनी फुलविक्रेत्यावर स्थलांतरित होण्यासाठी कुठलाही दबाव टाकला गेला नसल्याचे सांगितले. स्थलांतरामुळे आरोग्य, स्वच्छता, वाहतूक कोंडीचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केला. स्थलांतरित होणाऱ्या फूल व्यावसायिकांमध्ये गणेशवाडीतील संकुलात कायमस्वरूपी जागा मिळेल की नाही याबद्दल साशंकता आहे. गणेशवाडीत स्थलांतर म्हणजे आमची फसवणूक आहे. काही महिन्यांसाठी विक्रेत्यांना संकुलात पाठविण्यात आले आहे. पालिकेने विक्रेत्यांशी चर्चा केलेली नाही. गणेशवाडीतील संकुल गंगेच्या पलीकडे आहे. त्यामुळे गोदाकाठ, भाजीबाजार ओलांडून आमच्यापर्यंत कोण येणार, असा प्रश्न विक्रेत्यांनी उपस्थित केला. जागेचा प्रश्न कायमस्वरूपी न सुटल्यास पुन्हा रस्त्यावर येण्याचा इशारा फुलविक्रेत्यांनी दिला आहे.
‘फुलविक्रेत्यांमधील संभ्रम दूर करणार’
महापालिकेने फुलविक्रेता संघटनेशी चर्चा केली आहे. त्यानुसार आधीपासून जे त्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत, त्या विक्रेत्यांना संकुलात बसण्यासाठी परवाने देण्यात आले. मात्र हा कालावधी आठ महिन्यांचा आहे. आठ महिन्यांनंतर त्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येईल. मात्र, काही विक्रेत्यांनी आठच महिने तिकडे पाठविल्याचा गैरसमज पसरविल्याने फुलविक्रेत्यांचा गोंधळ उडाला आहे. याविषयी पालिका पुन्हा एकदा बैठक घेऊन संभ्रम दूर करेल, असे महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनी सांगितले.