सणोत्सवांचा हंगाम सुरू असल्याने फुलांचे रंग बहरात आले आहेत. सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळू लागला आहे. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात पूजेसाठी व सजावटीसाठी ग्राहकांकडून फुलांची खरेदी सुरू आहे. बाजारपेठेत फुलांची मागणी वाढली आहे, पण पाहिजे त्या प्रमाणात आवकच नसल्याने त्यांचे भाव तिपटीने वाढले आहेत.
उपराजधानीतील फुलांच्या नेताजी मार्केटमध्ये राज्यातील नाशिक, पुणे, शिर्डी, हिंगोली, अकोला आदी शहरांतून आणि राज्याबाहेरील हैदराबाद, कोलकाता आदी शहरांमधून फुलांची आवक होते. यंदा पाऊस कमी असल्याने स्थानिक पातळीवरील आवकही कमी आहे. उत्सवाच्या निमित्ताने मागणी मात्र जास्त आहे. फुलांमध्ये गुलाब, फोरलिनिया, मोगरा, पिटोनिया, जास्वंद चाफा, मोगरा, गौरी चाफा, टिपू आदी प्रकार बाजारपेठेत विक्रीला असून भाव किमान ४० रुपये प्रति किलोपासून १०० रुपयांपर्यंत आहे. गुलाबाचे २० फुलांच्या एका बंडलाचा भाव १०० रुपये आहे. लिली ४० रुपये, तर रजनीगंधा ४०० रुपये प्रती किलो आहे. जाईच्या फुलांचा भाव आकाशाला भिडला आहे. सध्या ६०० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. गणेशोत्सवात सर्वच फुलांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. विदर्भात पारंपरिक पद्धतीने फूलशेती केली जात असून झेंडू, गुलाब, निशीगंध, मोगरा, शेवंती, जरबेरा या फुलांचे उत्पादन घेतले आहे.
हवामान, पाण्याची उपलब्धता व लागवडीस उपयुक्त असलेली उपलब्ध जमीन यावर या शेतीचे उत्पादन अवलंबून आहे. राज्यात आतापर्यंत काही निवडक जिल्ह्य़ांमधील शेतकरीच फूलशेती करीत होते. विदर्भात नागपूर व अकोला जिल्ह्य़ांतील शेतकरी फूलशेतीतून उत्पादन घेत आहेत. हरितगृहांमुळे आता इतर जिल्ह्य़ांतील शेतकऱ्यांनाही हा पर्याय खुला झाला आहे. नागपूर जिल्ह्य़ात जवळपास अडीचशे हेक्टर क्षेत्रात फूलशेती केली जात आहे.
 यात नागपूर, कामठी, हिंगणा, भिवापूर, काटोल व कुही या सहा तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मोठय़ा शहराला लागून असलेल्या क्षेत्रांमध्य फूलशेती करणे शेतक ऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

विदर्भात उशिरा लागवड
पावसाअभावी विदर्भात फुलांची लागवड उशिरा झाली. त्यामुळे स्थानिक मालाची आवक फारच कमी आहे. जिल्ह्य़ाबाहेरून आलेल्या मालाचा पुरवठा ग्राहकांना केला जात आहे. वाहतूक खर्च आणि होणारी घट यामुळे भाव तिपटीने वाढले आहेत, असे नेताजी फुले मार्केटमधील व्यापारी शशिकांत सूर्यवंशी यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. यावर्षी ७० टक्के माल बाहेरून येत आहे. उत्सवामुळे झेंडू, गुलाब, कुडी झेंडूची मागणी जास्त आहे. जाई, लीली आणि रजनीगंधाचे भाव जास्त आहेत. यावर्षी कमी पावसाचा फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. सण, उत्सवामुळे मागणी अधिक असल्याने भाव तेजीतच राहतील, असे फुलांचे व्यापारी मंगेश खवसे म्हणाले.