अंधारात प्रवास करताना गाडीचा अपघात होऊ नये म्हणून फ्लोरोसंट रंगाच्या पट्टय़ा रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कोपऱ्यावर झाडाला लावलेल्या आपण नेहमीच पाहतो. या रंगांनी समोरचा रस्ता दिसतोच, पण अडथळाही लक्षात येतो. इलेक्ट्रिक ब्ल्यू, शॉकिंग पिंक, नियॉन ग्रीन, लेमन यल्लोसारख्या प्रकाशात चमकणाऱ्या आणि डोळ्यात भरणाऱ्या रंगांचा यापलीकडे फारतर पुस्तकांमध्ये ओळी अधोरेखित करणाऱ्या मार्कर्समध्ये होऊ शकतो याचीच आपण कल्पना केली होती. पण मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये याच रंगांच्या कपडे, दागिने, बॅग्स, शूज वापरण्याची फॅशन आली आणि तिने सर्वानाच थक्क केलं. अल्पावधीत ही स्टाइल मुलींनी उचलून धरली पण हे रंग लोकांना फारसे पसंत पडले नाहीत. पण आता हा ट्रेंड परतला असून यंदा मात्र डिझायनर्सनी या रंगांची तीव्रता कमी करण्याची खबरदारी घेतली आहे.
मागच्या वर्षी पाश्चात्त्य देशांमध्ये फ्लोरोसंट रंगांचा ट्रेंड सुरू झाला होता. त्यामुळे कपडय़ांपासून बॅग्स, शूज, दागिने इतकेच काय मेकअपमध्येसुद्धा फ्लोरोसंट रंगांची मक्तेदारी दिसून येत होती. रोज ऑफिसला जाण्यासाठी वापरायच्या कपडय़ांपासून ते रेड कार्पेट गाउन्सपर्यंत सर्वत्र या रंगांची जादू पसरली होती. एकदा एखादा ट्रेंड पाश्चात्त्य देशांमध्ये गाजला, की तो भारतात येण्यास वेळ लागत नाही. डिझायनरपासून ते स्ट्रीट मार्केटपर्यंत सर्व दुकाने या रंगांनी न्हाऊन गेली होती. इतकेच काय, तर नेलपॉलिश, लिपस्टिकमध्येही हे रंग येऊ लागले होते. एकीकडे मुलींना हे रंग आवडू लागले असतानाच मुलांना या रंगांनी गोंधळात टाकले होते. त्यामुळे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे हा ट्रेंड आला आणि गेलाही.
यंदाच्या उन्हाळ्यामध्ये हा ट्रेंड पुन्हा नाक वर काढू लागला आहे.  नुकत्याच झालेल्या फॅशन वीक्समध्ये अनेक डिझायनर्सनी या रंगांमधील कपडय़ांचे कलेक्शन सादर केले. पण मागच्या वेळेची चुकी करणे टाळले आहे. पाश्चात्त्य देशांतील गौरवर्णीय मुलींना साजेसे दिसणारे फ्लोरोसंट रंग भारतातील सावळ्या मुलींवर खुलून दिसले नाहीत. हे हेरून यंदा डिझयानर्सनी भारतीय त्वचेच्या रंगाला साजेसे असे फ्लोरोसंट रंग वापरले आहेत. यामध्ये सनशाइन यल्लो, बन्र्ड ऑरेंज, मिंट, कँडी पिंक, टर्किश ब्ल्यू या रंगांचा समावेश आहे. हे रंग डोळ्यात भरणारे असले, तरी त्यांची तीव्रता कमी आहे. त्यामुळे भारतीय त्वचेच्या रंगाला ते खुलून दिसतात. डिझायनर पंकज नीधी, वेंडील रॉड्रिक्स, अनुष्का रेड्डी, तरुण तेहलानी, मसाबा गुप्तासारख्या डिझायनर्सनी या रंगांचा वापर त्यांच्या कलेक्शनमध्ये केला आहे. ‘डिजिटल प्रिंटिंगमुळे कपडय़ांवर हे रंग उजळ दिसतात. त्यामुळे प्रिंटही स्पष्ट दिसते आणि नजरेत भरते. त्यामुळे हे रंग ट्रेंडमध्ये आले होते. पण त्यातील भडकपणा भारतील रंगाला साजेसा नसल्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजीचा सूरही होता. त्यामुळे यंदा हे रंग पुन्हा बाजारात आणताना मागच्या वर्षीची चुकी टाळण्याची खबरदारी घेतल्याचे,’ डिझायनर पंकज-निधी यांनी सांगितले. सध्या टॉप्सपासून ते अनारकलीपर्यंत विविध प्रकारच्या कपडय़ांमध्ये हे रंग दिसून येत आहेत. स्ट्रीट मार्केटमध्येही हे सहज पाहायला मिळतात.  
मुलांमध्ये गुलाबी रंग लाडका
गुलाबी रंग मुलींचा आणि निळा मुलांचा, हा लहानपणीचा नियम मोडत यंदा मुलांनीही गुलाबी रंगाला आपलेसे केले आहे. शर्ट, टी-शर्टमध्येच नाही, तर ट्राउझर जॅकेटमध्येही गुलाबी रंगाला मागणी जास्त आहे.