गुरुकुल प्रतिष्ठानच्या सातव्या ‘बासरी’ उत्सवात गुरू-शिष्य परंपरेत तयार झालेले तब्बल तीन पिढय़ांचे प्रतिनिधित्व करणारे दिग्गज कलाकार वेगवेगळ्या रागांवर आधारित सुरावटी एकत्रितपणे सादर करणार आहेत. त्यामुळे या उत्सवाच्या निमित्ताने ठाणेकरांना बासरीची सुरेल मैफल ऐकण्याची संधी अनुभवता येणार आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताची आणि त्यातही खास करून बासरीसह इतर कलाप्रकारांची जोपासना व संवर्धन करावे, या उद्देशातून स्थापन झालेल्या गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने सातव्या बासरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ठाणे येथील शिवसमर्थ विद्यालयात येत्या ४ आणि ५ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता ‘बासरी’ उत्सव होणार आहे. त्यात पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. शिवकुमार शर्मा, त्रिलोक गुर्टू आणि चौरासियांचे शिष्य विवेक सोनार आदी कलाकार सहभागी होणार आहेत. विवेक सोनार यांच्या नेतृत्वाखाली ‘फ्लुट सिंफनी’मध्ये मधुर सुरावटींनी महोत्सवाची सुरुवात होणार आहे. तसेच गुरू-शिष्य परंपरेत तयार झालेले तब्बल तीन पिढय़ांचे प्रतिनिधित्व करणारे दिग्गज कलाकार वेगवेगळ्या रागांवर आधारित सुरावटी एकत्रितपणे सादर करणार आहेत. त्यात बासरीबरोबरच किबोर्ड, सॅक्साफोन, डीजेंबे आणि इतरही वाद्यांचा समावेश असणार आहे. २००७ मध्ये ३५ कलाकारांच्या साहाय्याने या महोत्सवाला सुरुवात झाली होती. आता कलाकारांचा आकडा शंभरीवर गेला आहे. त्यांच्या बासरीतून निघणारा ध्वनी अतुल्य असतो. या उत्सवात एकाच व्यासपीठावर ८ ते ८५ वयोगटातील कलाकार सहभागी होत असतात. या उत्सवाची सांगता प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या अदाकारीने होणार आहे.