News Flash

उड्डाण पूल बनले यमदूत

वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून शहारच्या विविध भागात उभारण्यात आलेले उड्डाण पूल अपघाताचे ठिकाण ठरू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांत दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांच्या वेगावर

| March 30, 2013 05:04 am

उड्डाण पूल बनले यमदूत

* अपघातांची संख्या प्रचंड वाढली
* बेदरकार वाहनचालकांना ‘माज’
वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून शहारच्या विविध भागात उभारण्यात आलेले उड्डाण पूल अपघाताचे ठिकाण ठरू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांत दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांच्या वेगावर नियंत्रण आणि वाहतुकीचे नियमांचे पालन होत नसल्याने उड्डाण पुलावरील अपघातांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षभरात ४० पेक्षा अधिक अपघात उड्डाण पुलावर झाले आहे. धुलिवंदनाच्या दिवशी सीताबर्डी उड्डाण पुलावर झालेला भीषण अपघात हा त्याचाच एक प्रकार आहे.  
गेल्या दहा वर्षांच्या काळात वर्धा मार्गावर दोन, रेशीमबाग चौकात एक, पाचपावली, मानेवाडा रिंगरोड, रेल्वेस्थानक सदर, कडबी चौक, वर्धा रोड बुटीबोरी भागात उड्डाण पुल बांधण्यात आले. काही ठिकाणी अशा पुलांची गरज होती तर काही ठिकाणी भविष्याचा विचार करून पूल बांधण्यात आले, या पुलामुळे वाहतूकीची कोंडी दूर होण्याऐवजी पुल जेथे संपतो तेथे वाहतुकीचा खोळंबा वाढला तसेच पुलावरून धावणाऱ्या सुसाट गाडय़ांची संख्याही वाढली, त्यामुळे पूल बांधण्याच्या मूळ हेतूलाच फटका बसला आहे.
वर्धा मार्गावरून सुरू होणारा उड्डाण पूल विवेकानंदनगर चौकात संपतो. वर्धेकडून वेगाने येणाऱ्या गाडय़ा अगदी चौकात येऊन धडकत असल्याने येथे सकाळी सिग्नल सुरु होण्यापूर्वी आणि रात्री नऊनंतर सिग्नल बंद झाल्यावर अपघाताचा धोका संभवतो. यापूर्वी अनेक वेळा याच ठिकाणी अपघात झाले आहेत. राहटे कॉलनीपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या उड्डाण पुलाची हीच स्थिती आहे. बर्डीकडून विमानतळाकडे जाताना येणाऱ्या सुसाट वाहनांना ‘ब्रेक’ लागतो तो रहाटे कॉलनी चौकात. अनेक वेळा सिग्नल बंद असताना या वाहनांना त्यांच्या वेगावरही नियंत्रण मिळवणे कठीण जाते. या शिवाय उड्डाण पुलावरून येणारी वाहने ‘यु’ टर्न घेताना जर सिग्नल सुरू झाला तर चौकातच वाहतूक खोळंबते. बर्डीच्या उड्डाण पुलावरून जड वाहनांना बंदी असताना सर्रास धावताना दिसतात. वेगनियंत्रणासाठी  दुभाजक लावले असतानाही त्याचे पालन केले जात नाही आणि वाहतूक पोलिससुद्धा याकडे फारसे गांभीर्याने बघत नाहीत.
रेल्वे स्थानकापुढे बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्याऐवजी पुलाच्या दोन्ही बाजूने गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या पुलावर जाण्यासाठी रेल्वे पुलाजवळील दुर्गा मंदिर चौक आणि त्या बाजूने जयस्तंभ चौक असे दोन मार्ग आहेत. या दोन्ही चौकात दिवसभर वर्दळ असते. जयस्तंभ चौकाकडून येणारी वाहने थेट दुर्गा मंदिर या वर्दळ असणाऱ्या चौकात येतात, त्याच वेळी झिरो माईल्स चौकातून येणारी वाहनांची गर्दी आणि त्याचबरोबर विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे चौकात नेहमी वाहतुकीची कोंडी होते. गर्दीच्याच ठिकाणी बसथांबा असल्याने आणि कॉटनमार्केट चौकाकडे जाणारा रस्ताही अरुंद असल्याने येथे अक्षरक्ष: वाहनांची रेटारोटी होते. मात्र यावर अद्यापही पर्याय शोधण्यात आला नाही.
रेशीमबाग-सक्करदरा चौकातून जाणारा उड्डाण पूल अपघाताचे केंद्र बनला आहे. उड्डाण पुलावरून येणारी सुसाट वेगाने वाहने चौकात उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत असल्याचे प्रकार येथे घडले आहेत. विशेषत रात्रीच्या वेळी सिग्नल बंद असताना चारही बाजूने येणारी वाहने परस्परांना धडकण्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत. वर्धा मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल अरुंद असल्याने डोकेदुखी अधिक वाढली आहे. एक वाहन जरी पुलावर नादुरुस्त झाले किंवा उलटलेतरी शहरात येणारी संपूर्ण वाहने खोळंबून पडतात. अशाच प्रकारचा दुसरा उड्डाण पूल बुटीबोरी येथे होऊ घातला आहे. तेथेही अशीच अवस्था निर्माण झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याचा धोका आहे. इतवारी दहीबाजार या भागात असलेली वर्दळ लक्षात घेता या भागात उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे.
या संदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले, मुळात उड्डाण पुलाची रुंदी कमी असल्यामुळे साधारणत एकावेळी एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहन जाऊ शकतात  मात्र काही उत्साही लोक सुसाट वेगाने गाडी नेत ओव्हटेक करण्याचा प्रयत्न करीत असतात त्यातून अपघात होत असतात. शिवाय हेलमेट न  घालता गाडी चालवत असल्यामुळे त्यातून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.मुंबई पुण्याला हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी वाहने चालविली जात नाही त्यामुळे तेथील अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. उड्डाणपुलावर गाडीची वेग मर्यादा ठरवून दिली आहेत. त्याप्रमाणे फलक लावण्यात आले आहे मात्र नागरिक त्याचे उल्लघन करीत गाडय़ा सुसाट वेगाने नेत असतात आणि त्यातून अपघात होत असतात, असेही मोरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2013 5:04 am

Web Title: fly over bridge became death trap
टॅग : Danger
Next Stories
1 देऊळगावराजा परिसरातील कोटय़वधीची वनसंपदा धोक्यात
2 ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’चा आढावा घेण्यासाठी प्रधान सचिव येणार
3 अण्णाजी मेंडजोगे यांना कुशल संघटक पुरस्कार प्रदान
Just Now!
X