मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अत्याधुनिक तंत्राच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ६.१ किलोमीटर लांबीच्या महाकाय उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
तत्पुर्वी, द्वारका ते नाशिकरोड रस्ता सहापदरी करणे आणि नाशिक ते सिन्नर रस्ता चौपदरी करण्याच्या कामाचे भूमीपूजन पवार यांच्या हस्ते होणार आहे.
राज्यातील सर्वाधिक लांबी असणारा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर गत तीन वर्षांपासून प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या शहरवासीयांना मोकळा श्वास घेता येईल. महामार्गावरून मार्गस्थ होण्यासाठी आता उड्डाणपुलासह एकूण १२ पदरी रस्ता वाहतुकीसाठी खुला होत आहे.
या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय महामार्ग परिवहन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. तुषार चौधरी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह खा. समीर भुजबळ व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात हा कार्यक्रम होईल. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात पिंपळगाव-नाशिक-गोंदे या ६० किलोमीटरचा महामार्ग सहापदरी करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्या अंतर्गत नाशिक शहरात एक तर नाशिक शहराबाहेर दोन उड्डाणपूल आहेत. शहरातील या लांबलचक उड्डाणपुलासाठी ‘स्टरटेड’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याआधी बँकांकमध्ये अशा तंत्रज्ञानाच्या आधारे पूल तयार करण्यात आला आहे. आशियातील दुसरा तर भारतातील पहिला असा हा पूल असल्याचा दावा केला जातो. विस्तारीकरणाच्या या टप्प्याचा एकूण खर्च ९४० कोटी रूपये आहे. त्यातील जवळपास ८० टक्के म्हणजे ७०९.५२ कोटी रूपये केवळ महापालिका क्षेत्रातील कामावर झाला आहे. त्यात सव्‍‌र्हिस रोडचा खर्च समाविष्ट नाही.
उड्डाण पुलाचे काम पूर्णत्सास जाण्यास साडे तीन वर्षांचा कालावधी लागला. महामार्गावरील वृक्षतोडीस पर्यावरणवाद्यांनी विरोध केल्यामुळे वर्षभर हे काम रखडले होते. या वृक्षांचे पुनरेपण करण्याची तयारी दाखविली गेल्यानंतर विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. उड्डाण पुलाच्या कामामुळे महामार्गावरील वाहतूक सव्‍‌र्हिस रोडवरून वळविणे क्रमप्राप्त ठरले. परिणामी, गोविंदनगर, मुंबईनाका, द्वारका चौक, नवीन आडगाव नाका अशा अनेक ठिकाणी अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
या काळात अनेक अपघात झाले. त्यात कित्येकांना प्राण गमवावे लागले. या घडामोडींमुळे उड्डाणपूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने दररोज सहन कराव्या लागणाऱ्या जाचातून शहरवासीयांची अखेर सुटका होणार आहे. ज्या अवजड वाहने आणि मालमोटारींना शहरात यावयाचे नाही, ती सर्व उड्डाण पुलावरून मार्गस्थ होतील. यामुळे पुलाखालील सव्हिस रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. महामार्ग शहरवासीयांसाठी टोलमुक्त राहणार असल्याचे सांगितले जात असले तरी शहरातील जे वाहनधारक नाशिकहून मालेगाव, धुळ्याकडे मार्गस्थ होतील त्यांना पिंपळगाव बसवंत येथे तर जे मुंबईकडे जातील त्यांना घोटी येथे टोल भरावा लागेल. प्रारंभीचे दोन महिने नाशिककरांना सवलत दिली गेली असली तरी पुढील काळात त्याचा बोजा वाहनधारकांना सहन करावा लागणार आहे. लोकार्पण सोहळ्याआधी द्वारका ते नाशिकरोड आणि नाशिक ते सिन्नर रस्ता रूंदीकरण कामाचे भूमीपूजन पवार यांच्या हस्ते होणार आहे. नाशिकरोड येथील सिन्नरफाटा येथे हा कार्यक्रम होईल.