खैरी निमगाव येथील जयश्री हॉटेलच्या वेटर मनोज स्वामी याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेला एक दिवस झाल्यानंतर पोलिसांना तपासात कुठलीही प्रगती करता आलेली नाही. एवढेच नव्हेतर हा खून एकाच आरोपीने केला अशी सारवासारव करुन गुन्हेगारांना क्लिनचीट देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मृत वेटर मनोज स्वामी हा औरंगाबाद येथील असून त्याच्या नातेवाइकांनी प्रेत ताब्यात घेऊन शहरातीलच अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले. स्वामी याच्या हत्येनंतर फरार झालेला वेटर दिलीप सोनार याच्या घराचा ठावठिकाणा लागला नाही, मनमाडला गेलेले पोलीस पथक आज रिकाम्या हाताने परत आले. पोलीस निरीक्षक कैलास फुंडकर यांनी मनोज स्वामी याचा खून दिलीप सोनार या एकटय़ानेच केला असावा, अन्य गुन्हेगारांचा त्यामध्ये संबंध दिसत नाही तसेच आरोपी सोनार हा सापडल्यानंतर त्यावर प्रकाश पडेल, असे ते म्हणाले.
मृत मनोज स्वामी हा यापूर्वी नेवासा रस्त्यावरील टाकळीभान शहरातील गायत्री हॉटेलमध्ये नोकरीला होता. त्या वेळी तो रस्त्याच्या कडेला बाज टाकून झोपत असे. त्याच्या डोक्याजवळ नेहमी दगड व मिरचीची पूड असे. तो सणकी स्वभावाचा होता. अन्य वेटरला जीवे मारण्याच्या धमक्या तो देत असे. खून झाला त्या दिवशी तो दारू प्यायलेला होता. त्याला चालताही येत नव्हते, त्याची सोनारबरोबर वादावादी झाली. त्याचे पर्यवसान खुनाच्या घटनेत झाले असे फुंडकर यांनी सांगितले.
शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचा स्वामी याच्या खुनाशी संबंध आज तरी दिसत नाही, असे निरीक्षक फुंडकर यांनी सांगितले. पोलिसांनी स्वामी खूनप्रकरणात एकच आरोपी असल्याचे स्पष्ट केल्याने आता अन्य आरोपींचा शोध घेतला जाणार नाही हे उघड झाले आहे.