सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी टापूत परतीच्या मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. समाधानकारक पावसामुळे टँकरची संख्या १६० वरून १८वर आली आहे. गेल्या पाच महिन्यांत सुमारे ४० हजार जनावरे जगविण्यासाठी शासनाने ९४ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या २० दिवसांत जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगाव या दुष्काळी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ओढय़ानाल्यांना पूर आल्याने अनेक सिमेंट नालाबांध भरले आहेत. पावसामुळे जनावरांना चारा उपलब्ध झाला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत दुष्काळी भागात ५९ चारा छावण्या सुरू होत्या. यामध्ये आटपाडी ४४, तासगाव ३ आणि कवठे महाकांळ तालुक्यात १२ छावण्या सुरू होत्या. या सर्वच छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. जत तालुक्यात केवळ १८ गावे आणि ७२ वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून त्याचाही आढावा प्रशासन घेत आहे.