गारपीट, अतिवृष्टीने वैरण गेले. परिणामी, चाराटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील शेकडो जनावरे या चाराटंचाईचे बळी ठरले आहेत. माटरगाव, हिवरखेड या शिवारात गुरे मरून पडली आहेत. हा आकडा २०० हून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मार्चमधील गारपीट व अतिवृष्टीने गहू, हरभरा, सोयाबीन व तुरीचे अतोनात नुकसान केले. परिणामी, कुटार हातचे निघून गेले. त्यामुळे पशुपालकांसमोर चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यात आता पावसानेही दीड महिन्यापासून दडी मारल्याने जंगलात कोठेही गवत उगवले नाही. त्यामुळे झाडाच्या पालापाचोळ्यावर गुरांना जगविण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. गेल्या सोमवार ते बुधवार या तीन दिवसात जिल्ह्य़ात सर्वत्र पाऊस झाला. विशेष म्हणजे, हिवरखेड शिवारात तर ८० मि.मी. पाऊस झाल्याने हा परिसर अतिवृष्टीत आला. दोन दिवसाच्या झडीत चराईला असलेली गुरे गारठली अन् अशक्त होऊन मृत्यूमुखी पडू लागलीे. हिवरखेड शिवारात गेल्या ३ दिवसात १३५ जनावरे दगावल्याची माहिती खामगांव पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. २६ जुलैलाही १० जनावरे दगावली, तर दोन दिवसात गोपाळराव हटकर १५ गायी, गोरे, विठोबा शिंगाडे २५, गोरे शालीग्राम हटकर २० गायी, संतोष धानखेडे ५ गायी,संतोष बहुरुपी ४ गायी, तानाजी शिंगाडे व विजय हटकर यांच्या प्रत्येकी १० गायींसह अशा १२५ जनावरे दगावली असून आजही गावात अनेक जनावरे आजारी आहेत. त्यामुळे या जनावरांचे लसीकरण व इतर उपचार पशुसंवर्धन विभागाच्या खामगाव व बुलढाणा पथकाने केले. त्याचप्रमाणे माटरगाव शिवारात २५, जलंब शिवारात १०, पोरज, मच्छिंद्रखेड मांडणी या शिवारातही शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. या नैसर्गिक आपतीचा फ टका पशुपालकांना बसला आहे. आजही चाराटंचाईच प्रश्न पशुपालकांसमोर उभा आहे. नैसर्गिक आपत्तीत दगावली तर त्या गुराढोरांचे शवविच्छेदन होणे गरजेचे आहे. कारण, शवविच्छेदनाचा अहवालच आर्थिक मदतीसाठी ग्राह्य़ धरला जातो. पशुपालक हा शेतकरी नसल्याने अनेक लोकांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसाय व शेळीपालनावर आहे. त्यामुळे अशा पशुपालकांची जनावरे दगावली तर त्याला आर्थिक मदत मिळत नाही. त्यामुळे हा किचकट नियम बदलण्याची गरज आहे.