नववर्षांत एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता गारव्यापासून काहिसे दूर राहिलेले नाशिक शहर गुरूवारी अचानक दाट धुक्यांच्या छायेत हरवले आणि भल्या सकाळी मार्गस्थ होणाऱ्यांना त्यातून मार्ग शोधता शोधता चांगलीच कसरत करावी लागली. यंदाच्या हंगामात प्रथमच अशी धुक्याची दुलई पडल्याने नागरिकांनी त्याचा अनुभव घेण्यासाठी रस्त्यांवर थेट फेरफटका मारण्याची लगबग केली. हवेतील आद्र्रतेचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे हे बदल झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. गुरूवारी पडलेले धुके इतके दाट होते की, पंधरा ते वीस फुटापलीकडे काही दिसत नव्हते. वाहनधारकांना दिवे लावून मार्गस्थ होणे भाग पडले.
नववर्षांच्या सुरूवातीपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी तशी अंतर्धान पावली होती. ६ जानेवारी रोजी तापमानाचा पारा अचानक ६.८ अंशापर्यंत घसरला. परंतु, लगेचच म्हणजे तीन ते चार दिवसात तो पुन्हा १३ अंशावर गेला. वातावरणात असे बदल घडत असताना गुरूवारचा दिवस नाशिक शहर व परिसरासाठी दाट धुक्याची अनुभूती देणारा ठरला. पायी भ्रमंतीसाठी जाणाऱ्या नागरिकांना भल्या पहाटे सुखद धक्का बसला. सर्वत्र दाट धुक्याचे आच्छादन पसरले होते. काही अंतराच्या पलीकडे काय आहे हे देखील दिसेनासे झाले. पहाटेपासून दाटलेले हे धुके सकाळी आठ वाजेपर्यंत अनुभवता आले. त्याची माहिती कर्णोपकर्णी पसरल्याने बहुतेकांनी सकाळी लवकर उठून त्याचे दर्शन घेतले. गोदावरी पात्रावर त्याचे प्रमाण अधिक होते. नदीच्या एका तिरावरून दुसऱ्या तिरावरील काहीही दृष्टीपथास पडत नव्हते. दाट धुक्यामुळे रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनधारकांना दिवे लावून मार्गक्रमण करावे लागले.
जम्मू-काश्मिरमध्ये हिमवृष्टी होत असताना दुसरीकडे नाशिकमध्ये थंडीची लाट तशी ओसरली आहे. मुळात, उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्राच्या तापमानावर होतो आणि त्यामुळे थंडिची लाट येते, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या त्या भागात बर्फवृष्टी होत असली तरी उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्याने तापमान फारसे कमी झाले नाही. आकाश निरभ्र झाल्यास तापमान झपाटय़ाने खाली जाईल, असे सांगितले जात असताना शहर व परिसरावर धुक्याची दुलई अंधरली गेली. या संदर्भात हवामानशास्त्र विभागाकडे विचारणा केली असता आद्र्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. गुरूवारी किमान तापमान १३.४ अंश तर सकाळी आद्र्रतेचे प्रमाण ९४ टक्के होते. दोन दिवसांत आद्र्रतेचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढले आहे. त्याची परिणती धुक्यात झाल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले.