उत्तर प्रदेशची ‘नौटंकी’, कर्नाटक राज्यातील ‘यक्षगान’ यांसह देशाच्या विविध राज्यांतील लोककलांचा अविष्कार पाहण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. मुंबईत १३ ते १६ जानेवारी या कालावधीत लोककला परंपरा महोत्सव होणार असून त्यात मुंबईकरांना या लोककलांचे, संस्कृतीचे आणि लोककलाकारांचे दर्शन घडणार आहे.
मुंबई विद्यापीठाची लोककला अकादमी आणि पश्चिमक्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे. या महोत्सवातील सर्व कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील क्रीडासंकुलात रोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होणार आहेत. ‘भारतातील लोकनाटय़’ ही या महोत्सवाची मध्यवर्ती कल्पना आहे. उत्तर प्रदेशमधील नौटंकी, मध्य प्रदेशातील स्वांग, छत्तीसगढमधील नाचा, कर्नाटकातील यक्षगान, राजस्थानमधील तुर्रा-कलंगी आणि महाराष्ट्रातील तमाशा हे या परंपरा महोत्सवात सादर होणार आहेत. या महोत्सवास देशातील आणि परदेशातील सुमारे २५० अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर पुरुलिया छाऊ, यक्षगान हे कार्यक्रम होणार आहेत. १४ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता ‘नौटंकी’ तर रात्री आठ वाजता ‘कलंगी तुर्रा’चा प्रयोग रंगणार आहे. १५ जानेवारी रोजी ‘तमाशा’ आणि ‘नाचा’चा प्रयोग होणार असून १६ जानेवारी रोजी लोककला अकादमीचे शिक्षक आणि विद्यार्थी ‘लोकरंग’हा कार्यक्रम सादर करणार आहेत.