मंगल देशा, पवित्र देशा,
महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा
श्री महाराष्ट्र देशा..
 हे गीत वर्षांनुवर्ष सादर करणाऱ्या आणि महाराष्ट्राची लोककला आणि परंपरा पोवाडय़ाच्या माध्यमातून जपणाऱ्या विदर्भातील ४०० पेक्षा जास्त शाहिरांना आज उपेक्षित जीवन जगावे लागत आहे. अखेरच्या प्रवासात मानधनाची प्रतीक्षा करीत अनेक शाहिरांनी पाच वर्षांपूर्वी अर्ज केले असताना त्यांच्या पदरात काहीच पडले नसल्यामुळे आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर ते जीवन जगत आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्यावेळी महाराष्ट्रातील अनेक शाहिरांनी लोकगीतातून आणि लोकसंस्कृतीमधून समाजाला दिशा दिली. ज्या क्रांतीवीरांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल समाजात जागृती करण्यासाठी शाहिरांनी पोवाडय़ाच्या माध्यामातून केवळ महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये वेगळी क्रांती केली.
गेल्या अनेक वर्षांची शाहिरी परंपरा जपलेल्या विदर्भाच्या सांस्कृतिक पंढरीत अनेक दिग्गज शाहिरांनी पोवाडे आणि लोककलाप्रकाराने रसिकांना मोहीत केले. यातील काही शाहीर कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेले, काही त्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देण्यासाठी अखेरच्या प्रवासात आहेत. वार्धक्यात या शाहीर कलावंतांची उपेक्षा होत आहे. सरकारने या शाहिरांना मदतीचा हात दिला, मात्र तो मर्यादित शाहिरांना.
विदर्भातील अनेक शाहिरांनी मानधनासाठी दिलेले अर्ज पाच ते वर्षांपासून सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या लालफितीत पडून आहेत. मात्र, त्या अर्जाबाबत कुठलीच कारवाई केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने पूर्वी पाचशे रुपये मानधन दिले जात होते. मात्र, आघाडी सरकारच्या काळात शाहिरांमध्ये वर्गवारी केली असून त्यानुसार मानधन सुरू केले आहे.
ही वर्गवारी करताना शाहीर परिषदेला विश्वासात घेण्यात आले नसल्याचे परिषदेने म्हटले आहे.
विदर्भातील अनेक शाहिरांनी आणि लोककला सादर करणाऱ्या कलावंतांनी नागपूर  जिल्ह्य़ातील खंड विकास अधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. खंड विकास अधिकाऱ्यांमार्फत ते अर्ज समाज कल्याण विभागात जात असतात आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी त्यांच्या अर्जाबाबत विचार करून संबंधित शाहिरांना मुलाखतीसाठी बोलवतात आणि त्यानंतर ते सरकारच्या मानधन समितीकडे पाठविले जातात. आता तर सरकारने ऑनलाईन सुविधा केली असली ग्रामीण भागातील शाहीर मात्र ते करू शकत नाही त्यामुळे तो दुर्लक्षित आहे.

शाहिरांना सन्मानाने जगू द्या -कातेकर
भंडारा जिल्ह्य़ातील लोककला संघाचे अध्यक्ष आणि शाहीर सुबोध कातेकर यांनी सांगितले, शाहिरांना पूर्वी पाचशे रुपये मानधन दिले जात होते. त्यामुळे शाहीर परिषदेने मानधन वाढविण्याची विनंती केली. राज्य शासनाने शाहिरांमध्ये वर्गवारी करून १४००, १२०० आणि १००० रुपये मानधन देणे सुरू केले. मात्र, हे मानधन पाच महिने मिळत नसल्यामुळे त्यांना संसार चालविणे कठीण झाले आहे. शाहीर संचांना सरकारतर्फे अनुदान दिले जाते. मात्र, त्यासाठी वर्षांकाठी ३० ते ४० कार्यक्रम करणे आवश्यक आहे मात्र आज पोवाडय़ाचे आणि लोककलेचे कार्यक्रम कमी झाले. पूर्वी शाहीर हा केवळ पोवाडय़ासाठी प्रसिद्ध असताना आज मात्र आर्थिक मिळकत व्हावी या उद्देशाने तो तमाशा, खडीगंमत, दंडार, भारुड इत्यादी लोककला प्रकारात शाहिरी करू लागला आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आमगाव, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्य़ांतील अनेक शाहीर उपेक्षित जीवन जगत आहे. अनेक शाहिरांची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शाहिरांच्या समस्यांकडे लक्ष देऊन शाहिरांना सन्मानाने जगू द्यावे.