पुणे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, अपघातात मरण पावणाऱ्यांचे प्रमाणही वाढते आहे. त्यामुळे वाहनचालकांनी स्वतला वाचवण्यासाठी तरी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केले आहे.
पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे वाहतूक सुरक्षा पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. युद्धात जेवढे जवान शहीद झाले, त्यापेक्षा जास्त रस्ते अपघातात बळी पडतात. पुण्यात रोज आठशे नवीन वाहने रस्त्यावर येतात.  वाहतुकीची ही समस्या सोडवण्यासाठी पोलीस, महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन मंडळ या सर्वानी एकत्र येऊन काम करायला हवे, असे मत गुलाबराव पोळ यांनी व्यक्त केले. वाहतूक शाखेला अतिरिक्त मनुष्य बळ मिळणार आहे, अशी माहिती पोलीस सहायुक्त संजीवकुमार सिंघल यांनी दिली. या कर्मचाऱ्यांचा योग्य वापर करावा आणि चांगल्या पद्धतीने काम करावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली. तसेच पादचाऱ्यांची सुरक्षाही महत्त्वाची असल्याने फुटपाथवरील पोलिसांनी महापालिकेच्या सहकार्याने अतिक्रमणे काढून टाकावीत, अशी मागणीही केली.