स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात देशातील सर्व घडामोडींचा केंद्रबिंदू ज्यांच्याकडे ज्ञानाची शक्ती आहे अशा ब्राम्हण समाजाकडे जातो. देशाला दिशा देण्याचे काम या साडेतीन टक्के ब्राम्हण समाजाने केले आहे, असे प्रतिपादन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. ब्राम्हण समाजाने अल्पसंख्यांक गटात आग्रह धरून आरक्षण मागावे. आपण त्याचा पाठपुरावा करू, असे ते म्हणाले.
येथील ब्राम्हण सभेच्या वतीने आयोजित स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे होते. यावेळी व्यासपीठावर सुधाप्पा कुलकर्णी, संजय सातभाई, स्नेहलता कोल्हे, आशुतोष काळे, उपनगराध्यक्ष खांबेकर, सुरेश रासकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी अध्यक्ष संजीव देशपांडे, नगरसेविका ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांनी स्वागत केले.
खा. वाकचौरे म्हणाले की, समाजात जो चांगले काम करतो त्याच्याच नावाने बोटे मोडली जातात. देशातील कायदे आता स्त्रीजातीला पुढे ठेवून बनवले जात आहेत. येत्या विधानसभा, लोकसभेत ५० टक्के महिला सदस्य राहणार आहेत. स्त्रीभ्रूण हत्येस घरातील स्त्रीच जबाबदार असून सासरच्या मंडळींनी सांगावे व तिने ते ऐकावे हा विचार बदलण्याची गरज आहे.
ब्राम्हण सभेच्या मंगल कार्यालयाच्या बांधकामास ५ लाख रुपयांचा निधी देण्याचे वाकचौरे यांनी यावेळी जाहीर केले.
खासदार वाकचौरेंनी आरक्षणाबाबत केलेल्या भाष्यावर ससाणे म्हणाले की, सध्या आरक्षण असलेल्यांची काय अवस्था आहे ते पाहा. त्यामुळे ज्या समाजाने स्वत:च्या कर्तृत्वावर देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी योगदान दिले, दिशा देण्याचे काम केले, त्यांनी जगाला दिशा देण्याचे काम आपल्या बुद्धिचातुर्याने करावे. राधिका देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2013 2:52 am