प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण खंबीरपणे सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी पुढाकार घेऊ, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या नगरमधील त्रवार्षिक अधिवेशनात दिले.
शहरातील ओम गार्डनमध्ये आयोजित केलेल्या या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी लंघे बोलत होते. आ. डॉ. सुधीर तांबे, आ. बबनराव पाचपुते, राज्य संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर आदी उपस्थित होते. लंघे यांनी शिक्षकांच्या तालुकांतर्गत बदल्या व अदिवासी भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
खासगी संस्थांच्या स्पर्धेमुळे जि.प.च्या प्राथमिक शाळांतील गुणवत्ता वाढवण्याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन केले. तालुकांतर्गत बदलीचा निर्णय सरकारने घेतला आहे. लवकरच आदेश निघेल व एकस्तर वेतनश्रेणीचा आदेशही आठ दिवसांत जारी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आ. तांबे यांनी प्राथमिक शिक्षकांकडे पाहण्याचा प्रशासनाचा व राजकीय पदाधिका-यांचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले. सरकारही शिक्षकांना विनाकारण त्रास होईल, असे धोरणे राबवत आहे, त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू, असे आश्वासन दिले.
संघाचे नेते थोरात यांनी हे अधिवेशन लोकशाही पद्धतीने होत असल्याचे स्पष्ट करतानाच संघात कोणी अधिकृत किंवा अनधिकृत नाही, संघ एकत्रच आहे, असा दावा केला. राज्य सरचिटणीस केशव जाधव यांनी संघात आता शिवाजीपर्व संपून संभाजीपर्व सुरू झाल्याकडे लक्ष वेधले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांचेही भाषण झाले. उपसंचालक टेमकर यांनी आरटीईविषयी माहिती दिली. रावसाहेब रोहकले यांनी शिक्षक बँकेच्या कारभारावर सडकून टीका केली. आबासाहेब जगताप यांनी प्रास्ताविक केले.
 नव्या पदाधिका-यांची निवड
जिल्हा संघात पडलेल्या फुटीच्या पाश्र्वभूमीवर रावसाहेब रोहकले-आबासाहेब जगताप-संजय शेळके यांच्या गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत हे अधिवेशन आयोजित केले होते. संघातील विष्णू खांदवे-राजेंद्र शिंदे गटाच्या अधिवेशनापेक्षा रविवारी झालेल्या अधिवेशनास अधिक उपस्थिती होती. महिलांची संख्याही लक्षणीय होती. या वेळी नवीन पदाधिका-यांची निवड जाहीर करत फुटीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. नूतन पदाधिकारी असे : सदिच्छा मंडळ- बापू तांबे (अध्यक्ष), बाळासाहेब सरोदे (कार्याध्यक्ष), विठ्ठल फुंदे (सरचिटणीस). दिलीप औताडे (कोषाध्यक्ष). जिल्हा संघ-संजय शेळके (अध्यक्ष), राम निकम (कार्याध्यक्ष), संदीप मोटे (सरचिटणीस), राजेंद्र साळवे (दक्षिण जिल्हाप्रमुख), संतोष दुसुंगे (उत्तर जिल्हा प्रमुख). उच्चाधिकार समिती-रावसाहेब सुंबे (अध्यक्ष), सु. पा. वांढेकर (कार्याध्यक्ष), ज्ञानदेव बटुळे (सरचिटणीस). महिला आघाडी- विद्युलता आढाव (अध्यक्ष), संगीता साळुंके (कार्याध्यक्ष). केलास चिंधे, आर. पी. रहाणे, निळकंठ घायतडक, बाळासाहेब सहाणे व रा. वि. शिंदे (राज्य प्रतिनिधी).