मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने भाताची पिके करपू लागली होती. परंतु सोमवारपासून पावसाच्या सुरू झालेल्या संततधारेमुळे भातपिकांनी संजीवनी मिळण्याची शक्यता वाढली आहे. या पावसाच्या आगमनाने उरण तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून रखडलेल्या लावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. जूननंतर जुलै महिन्यात पाऊस होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु पावसाने महिनाभरापासून विश्रांती घेतल्याने भातशेतीवर परिणाम होऊ लागला होता. अनेक गावांतील शेतकरी आपली शेती टिकविण्यासाठी शर्थ करीत होते. अनेकांना उसने पाणी घेऊन तर काहींनी दूषित पाण्याचा आधार घेऊन भातशेती राखण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुतांश ठिकाणी पाणीच नसल्याने यावर्षीची भातशेती वाया जाणार अशी भीती होती.
एकीकडे पाऊस नाही तर दुसरीकडे कडक उन्हामुळे पिके करपू लागली होती. या करपत्या पिकांकडे पाहून शेतकरी हवालदिल झाला होता. सोमवारपासून उरण परिसरात पावसाने अधूनमधून हजेरी लावली आहे. पावसाची संततधार सुरू झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया दिघोडे येथील शेतकरी प्रदीप घरत यांनी व्यक्त केली आहे. मशागत करून भातपिकाच्या लावणीसाठी पावसाची वाट पाहत असल्याचे दादरपाडा येथील शेतकरी रवींद्र कासूकर यांनी सांगितले. या पावसाच्या पुनरागमनामुळे काही प्रमाणात का होईना शेतीला आधार मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी सावरला असला तरी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी व त्याच्या कुटुंबाची मेहनत मात्र पणाला लागली असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.