मॅगीमध्ये शिसे व अजिनोमोटोचे प्रमाण आढळल्याने अन्न भेसळीचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. त्यामुळे उरण शहर व परिसरातील रस्त्यावर व गल्लोगल्ली सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या चिकन, मटण, दम बिर्याणी या अन्नपदार्थाचीही तपासणी करून व ते विनापरवाना विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी येथे करण्यात येत आहे. गटारावरच अन्नपदार्थ शिजविले जात असल्याने त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न येथे उपस्थित करण्यात आला आहे.
दिल्लीसारख्या शहरात प्रसिद्ध असलेल्या दम बिर्याणीची चव आता गल्लोगल्ली पोहोचली आहे. नामांकित हॉटेलमधून एका बिर्याणीसाठी १२० ते १५० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच या हॉटेलमध्ये अर्धी बिर्याणी दिली जात नाही. याउलट सध्या उरण शहरात उघडण्यात आलेल्या दम बिर्याणीच्या दुकानातून ७० रुपये फुल, तर ५० रुपये हाफ अशी स्वस्त दरात बिर्याणी मिळत असल्याने बहुतांशी ग्राहक या दुकानांकडे आकर्षित झाले आहेत. शहरातील कोटनाका, कासमनगर, बालई, पेन्शनर्स पार्क, खिडकोळी नाका आदी ठिकाणी या बिर्याणीची दुकाने थाटलेली आहेत. काही दुकाने गाळ्यांमध्ये असली तरी बहुतांशी अन्न हे रस्त्यावरून विकले जात असल्याचे येथील नागरिक मुकेश थळी यांनी सांगितले. स्वस्त दरात हे अन्नपदार्थ मिळत असल्याने त्याच्या गुणवत्तेबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. हे अन्नपदार्थ करताना कोणत्याही प्रकारची स्वच्छता पाळली जात नसल्याचे येथील रहिवाशी महेश घरत यांनी सांगितले. एकीकडे मॅगीवर बंधने घातली जात असताना अस्वच्छतेत सर्वासमोर गटारावर शिजविले जाणारे अन्नपदार्थ व त्याचे होणारे दुष्परिणाम याबाबत प्रशासन गप्प का बसले आहे,  असा सवाल महेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.
कारवाई करणार
पेण येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी गौतम जगताप यांच्याशी संपर्क साधला असता रस्त्यावर व अस्वच्छ ठिकाणी अन्न शिजवून त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी उरण परिसरातील आमच्या अधिकाऱ्यांना आदेश देणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी बोलताना दिली. तसेच भविष्यात त्यांच्याकडून योग्य ती काळजी घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.