खामगाव येथील शासकीय अनुसूचित जाती मुलींच्या निवासी विद्यालयातील २३ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्यानंतर त्यांना खामगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
घाटपुरी येथील अनुसूचित जाती मुलींचे शासकीय निवासी विद्यालयात सुमारे २५० विद्यार्थिनी आहेत. दरम्यान, दुपारी ४ वाजता उपरोक्त निवासी विद्यालयातील विद्यार्थिनींना रक्त वाढीच्या गोळयांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता विद्याथिनींना फोडणीचे वरण व पोळीचे जेवण दिल्यानंतर सुमारे दहा ते पंधरा मिनिटातच विद्यार्थिनींचे पोट दुखायला लागले. म्हणून त्यांना शिक्षकाने एका खोलीत बसवून ठेवले होते. मात्र एका विद्यार्थिनीने उपरोक्त घटनेची माहिती मोबाईलद्वारे तिच्या वडिलांना दिली. त्यानंतर विद्यार्थिनीचे वडील निवासी विद्यालयात गेले असता शिक्षकाने, तुमच्या मुलीला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता.
मात्र त्यानंतर  शासकीय विद्यालयातील विद्यार्थिनी रूपाली प्रल्हाद इंगळे  रा.धानोरा, मनीषा नानाराव इंगळे रा.भालेराव, आग्रपाली सूर्यभान वाकोडे रा.बेलुरा, तन्वी प्रकाश सूर्यवंशी रा. लाखनवाडा, कोमल गजानन वाघमारे रा .लाखनवाडा, भाग्यश्री अरविंद इंगळे रा.पोरज, कोमल भीमराव धुंदळे रा.वडगांव वाण, प्रियंका शंकर कोळपे रा.टाकळी तलाव, संगीता रामकृष्ण ठोंबरे रा.नांद्री, शारदा महादेव तेलगेड रा.शिरजगांव देशमुख, कविता गोपाल हेलोडे रा.बोरजवळा, आरती गजानन गवई रा.अंत्रज, संजना सुनील खराटे रा.काबरखेड, अंकीता दादाराव शिरसाट रा.तांदुळवाडी, राधा हरिदास राठोड रा. घाटपुरी, रमा तुकाराम हेलोड रा.मोरंबा, शिवाणी राजाराम शिरसाट रा.तांदुळवाडी, कीर्ती विठ्ठल डांगरे रा.श्रीधरनगर, प्रतिभा संतोष कळस्कर रा. अंत्रज, प्रियंका सहदेव वाघ रा. अंत्रज, कल्याणी महादेव खंडेराव रा.शिरजगांव देशमुख, प्रज्ञा महादेव शिरसाट रा.तांदुळवाडी, राणी सुधाकर जाधव, रूपाली शामराव साटोटे अशा २३ विद्यार्थिनींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शिरसाट व सहकाऱ्यांनी त्वरित विद्यार्थिनींवर उपचार केले. या घटनेची माहिती मिळताच एसडीओ धनंजय गोगटे, नायब तहसीलदार माटे, भारिप- बमसंचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने यांनी सामान्य रुग्णालयात येऊन विद्यार्थिनींची विचारपूस केली.