तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या ओम गुरुदेव माध्यमिक विद्यालयातील ३९ विद्यार्थ्यांना पावभाजी व शंकरपाळ्यातून विषबाधा झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती अधीक्षक डॉ. अभिजित मिरीकर यांनी सांगितले. हे सर्व विद्यार्थी ११ ते १६ वयोगटातील आहेत.
बुधवारी रात्री विद्यार्थांना आश्रम ट्रस्टच्या वतीने पावभाजी व शंकरपाळी देण्यात आली. ३५० पैकी ३९ विद्यार्थ्यांना वांत्या व मळमळ होऊ लागल्याने त्यांना तातडीने आत्मा मालिक रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे बहुतांशी विद्यार्थ्यांना उपचारानंतर लगेच सोडून देण्यात आले असे डॉ. मिरीकर यांनी सांगितले. निवासी नायब तहसीलदार पाठक, आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त वसंतराव आव्हाड आदींनी भेटी देऊन चौकशी केली.