अन्नधान्याची कोठारे भरलेली असताना शेतकरी मात्र आत्महत्या करीत आहेत. हे विसंवादी चित्र बदलल्याशिवाय देशाचा पोशिंदा सुरक्षित राहू शकत नाही. तोपर्यंत शेती व शेतीशी संबंधित घटकांचा विकास होणे अशक्य असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखडे यांनी राष्ट्रीय परिषदेत व्यक्त केले. ही परिषद लोहिया अध्ययन केंद्राचे सचिव हरीश अडय़ाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
यवतमाळच्या डॉ. व्ही.एम. पेशवे सामाजिक संशोधन संस्था आणि लोहिया अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अन्नधान्य सुरक्षा आणि मानवाधिकार’ या विषयावर एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली. उद्घाटक व बीजभाषक म्हणून ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखडे होते. संस्थेच्यावतीने राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार तांदूळ संशोधक दादाजी खोब्रागडे यांना प्रदान करण्यात आला. रोख पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी मार्मिक विचारातून शेतकरी क्षेत्रातील वास्तववादी चित्र वानखडे यांनी परिषदेसमोर मांडले. ते म्हणाले, भारत एका बाजूला हरितक्रांतीच्या माध्यमातून सुजलाम् सुफलाम् झाल्याचे चित्र दर्शवले जात आहे. अन्नधान्यांनी भारताची कोठारे भरली असून प्रत्येक मानवाचा हक्क म्हणून त्याच्या उपजीविकेकरिता अन्नधान्याची सुरक्षा करण्यात आलेली आहे. ३० लक्ष कोटी टन अन्न सुरक्षित ठेवण्यात येत आहे, असे असताना अन्नधान्यांची उपज करणारा, श्रम गाळणारा मात्र आत्महत्या करीत आहे. गारपीट, दुष्काळ, अकाली पाऊस, भाववाढ, उत्पादित मालाला भाव नसणे यामुळे तो गलितगात्र होऊन आत्महत्या करीत आहे. देशोधडीला लागलेला असताना शासन, प्रशासन पातळीवर मात्र त्याच्या प्रती अजूनही आकसच आहे. ही स्थिती केव्हा व कधी बदलणार हा लाख मोलाचा प्रश्न आहे. युद्धात सैनिक व नागरी लोक जितके मारले गेले त्यापेक्षाही जास्त प्रजासत्ताक भारतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. डाव्या-उजव्या दोन्ही गटांना शेतकरी शोषण करणारा वाटत आला. त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण दूषित राहिल्याने विकासपूरक स्थिती निर्माण करण्यात आली नाही. शेतकरी व्यसनाधीन आहे, ऋण काढून सण साजरा करणारा आहे, अशी ठाशीव स्वरुपाची टीका करीत येथील अभिजन वर्गाने त्याच्या जखमेवर मीठ चोळलेले आहे. याउलट ज्या पांढरपेशीय वर्गात मोठय़ा प्रमाणात व्यसने आहेत, ती मात्र आत्महत्या करताना दिसत नाही. हा विसंवाद मांडून वानखडे यांनी येथील बुद्धिजीवी वर्ग, शासन-प्रशासन यांच्या कोडग्या मानसिकतेवर प्रहार केला.

याप्रसंगी मानवी हक्क क्षेत्रात कार्यरत कार्यकर्ते, प्राध्यापक, संशोधक, पत्रकार, मान्यवर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष राम बुटले, डॉ. वसंतराव रायपूरकर, डॉ. अलका देशमुख, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. मोहन काशीकर, डॉ. अखिलेश पेशवे, पत्रकार सुरेश भुसारी, परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संचालन लोहिया अध्ययन केंद्राचे सचिव संदीप तुंडूरवार यांनी केले.