अन्न सुरक्षा योजनेमध्ये जिल्ह्यातील ८ लाख ४३ हजार १८० लाभार्थी असून, या लाभार्थ्यांसाठी दर महिन्याला ३ हजार ५३४ मेट्रिक  टन धान्य लागणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना लागू करण्याचा अध्यादेश १७ डिसेंबरला काढला होता. पी.बी.एल., ए.पी.एल. व अंत्योदय योजनांतील रेशनधारक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनी ही योजना लागू करण्यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम २०१३अंतर्गत शहरी भागासाठी ४५.३४ टक्के, तर ग्रामीण भागासाठी ७७.३२ टक्के लाभार्थीची निवड या योजनेत करावयाची होती. त्याप्रमाणे पुरवठा विभागाने लाभार्थ्यांची निवड निश्चित केली.
जिल्ह्यात दरमहा ३ हजार ५३४ मे. टन धान्य लागणार आहे. यात ए.पी.एल.चे लाभार्थी ४ लाख ४ हजार ८७५, बी.पी.एल.चे ३ लाख १ हजार ७६०, तर अंत्योदय योजनेचे १ लाख ३६ हजार ५४५ या प्रमाणे निवड निश्चित केली आहे. ए.पी.एल. व बी.पी.एल. लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य, यात २ रूपये दराने ३ किलो गहू, तर ३ रूपये दराने २ किलो तांदूळ दिला जाणार आहे.
जिल्ह्यास दरमहा ८०९ मेट्रिक टन तांदूळ, तर अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा ९०६ मेट्रिक टन गहू व ६०४ मेट्रिक टन तांदूळ लागणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांना २ रुपये दराने  २५ किलो गहू व ३ रूपये दराने १० किलो तांदूळ असे ३५ किलो धान्य दिले जाणार आहे. अन्नसुरक्षा योजनेत अपात्र ठरलेल्या ३ लाख ८३ हजार ८७५ लाभार्थ्यांना ७ रूपये २० पसे प्रतिकिलो दराने गहू, तर ९ रूपये ६० पसे प्रतिकिलो दराने तांदूळ मिळणार आहे.