राज्यातील अन्नसुरक्षा विधेयकाअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी लागू करण्यात आलेल्या अन्नसुरक्षा योजनेची सुरुवात नवी मुंबईतून होणार असून ३१ जानेवारी रोजी दिघा येथील पटनी मैदानावर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अर्धे मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. त्यामुळे लाभार्थीच्या केशरी व पिवळ्या शिधापत्रिकांवर योजनेचे शिक्के मारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या लोकसभा अधिवेशनात देशातील अन्नसुरक्षा विधेयकावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे देशातील ८२ कोटी गरीब जनतेला तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नावली हे अन्नधान्य मोफत मिळणार आहे. या योजनेचा देशात विविध ठिकाणी शुभारंभ केला जात असून राज्यात ही योजना १ फेब्रुवारीपासून सुरू केली जाणार आहे. त्याचा शुभारंभ कार्यक्रम नवी मुंबईतील एमआयडीसी भागात असणाऱ्या दिघा येथील विस्र्तीण अशा पटांगणात होणार आहे. नवी मुंबईत या योजनेचे सुमारे ६१ हजार लाभार्थी असून ठाणे जिल्ह्य़ात ही संख्या दोन लाखांपेक्षा जास्त आहे. त्यातील काही लाभार्थीना या योजनेतील अन्नधान्याचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर ही योजना प्रत्येक शिधावाटप केंद्रावर सुरू होणार आहे. या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यावर आहे. त्यामुळे नाईकांची खासगी तसेच शासकीय यंत्रणा या कार्यक्रमांच्या तयारीसाठी लागली आहे. ठाणे जिल्ह्य़ातील लाभार्थीसाठी सध्या पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकांवर शिक्का मारण्याचे काम सुरू असून एका निरीक्षकावर दहा शिधावाटप केंद्रांतील शिधापत्रिकांवर शिक्के मारण्याचे काम देण्यात आले आहे. कर्मचारी कमी असल्याने २६ जानेवारीपर्यंत हे काम होणे शक्य नाही, असे मत अधिकारी वर्ग व्यक्त करीत आहे.
आतापर्यंत ३१ हजार शिधापत्रिकांवर शिक्के मारून झालेले आहेत. शहरी भागातील रहिवाशांना विविध पक्षांचे कार्यकर्ते याबाबत मार्गदर्शन करीत आहेत, पण ग्रामीण भागातील रहिवाशांच्या गावी अद्याप ही योजना पोहोचलेली नाही. त्यामुळे शासनाला खूप मोठय़ा प्रमाणात या योजनेची जनजागृती करावी लागेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.