सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर राजकीय नेत्यांनी राजकारण, पक्ष यांच्या पलिकडे जाऊन विचार केला पाहीजे. राजकारण हे खरेतर सेवा करणारे साधन आहे. मात्र दुर्दैवाने सध्या ते पैसे कमविण्याचे साधन झाले आहे. या सर्वाच्या पलिकडे जाऊन एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे, तरच अन्नसुरक्षा कायदा योग्य प्रकारे अमलात येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.
ठाणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रगती महाविद्यालय कला आणि वाणिज्य अर्थशास्त्र विभागाने राष्ट्रीय स्तरावरील अन्नसुरक्षा कायदा २०१३ या विषयावरील दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात केले आहे. या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष पुष्पलता पाटील, कार्यवाह वामन पाटील, महाविद्यालयाचे प्रा. अशोक महाजन आदी उपस्थित होते.
डॉ. मुणगेकर पुढे म्हणाले, केंद्र सरकारने २००९ मध्ये शिक्षणाचा कायदा मंजूर केला आणि २०१३मध्ये अन्नसुरक्षा कायदा मंजूर केला. देशात मोठय़ा प्रमाणात कुपोषण असून गरिबांना सकस आहार मिळत नाही, त्याचा हा परिणाम आहे. कडधान्याच्या किमती वाढल्याने उत्पन्न कमी झाले. यामुळे गरीब लोक केवळ तांदुळ, गहू ज्वारी यावर अवलंबून आहेत. जगात एक तृतीयांश मुले कुपोषित असून आपल्या देशातही कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. आर्थिक विकासाचा लाभ सर्वसामान्य लोकापर्ंयत पोहोचला पाहिजे, असेही ते म्हणाले
देशातील विविध महाविद्यालयातून सुमारे ८० शोधनिबंध आले असून त्याचे चार सत्रात वाचन व चर्चा होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. अविनाश शेंद्रे यांनी केले.