स्वत:पासून सुरूवात या तत्वाला जागत महापालिकेने पक्ष्यांसाठी आपल्या इमारतीच्या गच्चीवर दाणापाणी सुरू करून नंतर नागरिकांनीही असेच करावे म्हणून आवाहन केले. पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या हरियाली संस्थेने मनपाला असे करायला लावले.
संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी शहरात ठिकठिकाणी पाणवठे सुरू करतात, त्याशेजारी त्यांना खाणे म्हणून विविध कडधान्यांचा भरडा ठेवतात. नागरिकांनीही असे करावे असे त्यांचे सतत आवाहन असते. यावेळी त्यांनी महापौर शीला शिंदे व आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनाच मनपा कार्यालयाच्या गच्चीवर अशी पक्ष्यांसाठीची पाणपोई सुरू करण्याची कल्पना ऐकवली.
उत्साही महापौर, आयुक्तांनी लगेचच त्याला मान्यता देत नव्या प्रशासकीय इमारतीच्या गच्चीवर ही पाणपोई सुरू केली. मातीच्या उथळ भांडय़ात पाणी ठेवण्यात आले. त्याच्या शेजारीच कडधान्यांचा भरडा टाकण्यात आला. महापौर, आयुक्त तसेच स्वत: खामकर, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, प्रा. अरविंद गोरेगावकर, प्रविण कुलकर्णी, शारदा होशिंग, गणेश भगत, सचिन वाघुळे, जालिंदर बोरूडे, भैय्या गंधे, यु. जी. म्हसे आदी यावेळी उपस्थित होते.