येथे गुरुवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात नेदरलँडने भारतीय संघावर २ विरुद्ध शून्य गोलने विजय मिळविला. भारतीय महिला फुटबॉलपटूंनी चांगला खेळ करूनही उंच्यापुऱ्या नेदरलँडच्या खेळाडूंसमोर त्यांचा निभाव लागला नाही. शाहू स्टेडियमवर झालेल्या या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी २५ हजारांहून अधिक फुटबॉलप्रेमी नागरिकांनी गर्दी केली होती. कोल्हापूरकरांचे फुटबॉलप्रेम सर्वश्रुत आहे.
पावसाळा वगळता येथे नेहमीच फुटबॉलचे सामने सुरू असतात. पुरुषांच्या बरोबरीने महिलांतही फुटबॉल लोकप्रिय व्हावा, असे प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत भारत विरुद्ध नेदरलँड या संघामध्ये फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संघाने दोन दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात स्थानिक महिला संघाला १२ विरुद्ध शून्य गोलने सहजरीत्या पराभूत केले होते. त्यामुळे हा संघ नेदरलँडविरुद्ध लढताना अशीच भरीव कामगिरी करणार का याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधले होते. यासाठीच शाहू स्टेडियम फुटबॉल शौकिनांच्या गर्दीने खचाखच भरले होते.     
नेदरलँडच्या महिला खेळाडू उंच्यापुऱ्या होत्या. त्यांची शरीरयष्टीही धिप्पाड होती. तुलनेने भारतीय महिला खेळाडू त्यांच्या खांद्यापर्यंतही पोहचत नव्हत्या. त्यांचा बांधाही मध्यम स्वरूपाचा होता. नेदरलँडच्या खेळाडूंचा खेळही वेगवान आणि चपळ होता. आंतरराष्ट्रीय सामन्यात कसा खेळ करावा, याचे प्रात्यक्षिकच या देशाच्या खेळाडूंकडून होत होते.     
सुरुवातीपासूनच नेदरलँडचा संघ आक्रमक होता. अवघ्या चौथ्या मिनिटालाच जोलेन व्हॅन डेर जस्ट या ७ नंबर जर्सी घातलेल्या खेळाडूने पहिला गोल नोंदविला आणि संघाचे खाते उघडले. त्यानंतर दोन्ही संघांत तुल्यबळ खेळ होत राहिला. मात्र नेदरलँडच्या खेळाडू अधिक आक्रमक होत्या. अशाही स्थितीत भारतीय संघातील खेळाडूंनी चार ते पाच वेळा गोल नोंदविण्याचा चांगला प्रयत्न केला. उत्तरार्धात तर एकगोल होता होता वाचला. सामन्याच्या ७६व्या मिनिटाला १३ नंबरची जर्सी परिधान केलेल्या सिल्वना टिलेनमन हिने गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. भारताच्या परमेश्वरी देवी, योगिना फर्नाडिस, मनिका जाना, एस. वैशांती यांनी उत्कृष्ट खेळ केला.     
या सामन्याचे आयोजन अखिल भारतीय फुटबॉल महासंघ नवी दिल्लीच्या वतीने करण्यात आले होते. त्याला पश्चिम भारत फुटबॉल असोसिएशन मुंबई व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन यांचे सहकार्य लाभले. सामना पाहण्यासाठी छत्रपती शाहूमहाराज, महापौर जयश्री सोनवणे, युवराज मालोजीराजे, जिल्हाधिकारी राजाराम माने, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, माणिक मंडलिक आदी उपस्थित होते.