मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गावर दरवर्षी होणाऱ्या अपघाती मृत्यूंपैकी निम्मे जीव रेल्वे रूळ ओलांडताना जातात, हे स्पष्ट झाल्यानंतर आता त्याबाबत रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार यांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांनी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडल्यास त्यांच्यावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान कारवाई करीत असले, तरी दोन स्थानकांमधील भागांत होणाऱ्या अपघाती घटना कशा थांबवायच्या, हा प्रश्न रेल्वेसमोर आ वासून उभा आहे. रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ट्रेसपासिंग कंट्रोल योजना आखली आहे. या योजनेंतर्गत ११ उपनगरीय स्थानकांवर पादचारी पूल, सरकते जिने आणि उद्वाहक बसवण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांत काही उपनगरांमध्ये विकास झाला असला, तरी तेथील स्थानके मात्र आहेत तशीच आहेत. तेथे काही सुधारणा झाल्या नसल्याची तक्रार प्रवाशांकडून वारंवार केली जाते. जे. जे. कला महाविद्यालय आणि ‘राईट्स’ या संस्थांनी केलेल्या पाहणीच्या आधारे एक अहवाल तयार केला होता. या अहवालाच्या आधारे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) एक योजना समोर आणली आहे. या योजनेद्वारे पश्चिम आणि मध्य अशा दोन्ही रेल्वेमार्गावर मिळून ११ स्थानकांत पादचारी पूल, सरकते जिने बसवण्यात येणार आहेत.
या ११ स्थानकांमध्ये कांजूरमार्ग, कुर्ला, ठाणे, कल्याण, दादर, बोरिवली आदी स्थानकांचा समावेश आहे. या ११ स्थानकांवर मिळून १३ पादचारी पूल, २५ सरकते जिने बसवले जाणार आहेत. १८० कोटी रुपयांची ही ट्रेसपासिंग कंट्रोल योजना मे-जून २०१६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर पादचारी पुलांची प्रवाशांची मागणी पूर्ण होणार आहे.

ठाणे-विटावा पादचारी पूल
ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणारे बहुतांश अपघात विटावा ते ठाणे या परिसरात होतात. या ठिकाणांहून प्रवासी रेल्वे रुळांतून चालत ठाणे स्थानकात येतात. या टप्प्यात पादचारी पूल उभारण्याची मागणी आहे. या मागणीचा पाठपुरावा सुरू असल्याने येत्या काही वर्षांत हा पूल पूर्ण होण्याची शक्यता आहे.

रेल्वे फाटके बंद होणार का?
रेल्वे फाटकांदरम्यान होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही लक्षणीय आहे. काही वर्षांपूर्वी विक्रोळी येथील रेल्वे फाटकातील अपघातांचे प्रमाण खूप होते. मात्र रेल्वेने हे फाटक बंद करून स्थानिकांना रेल्वेपुलाचा वापर करण्याची परवानगी दिली. त्यानंतर येथील अपघात बंद झाले आहेत. मात्र पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गावर अनेक ठिकाणी रेल्वे फाटके बंद होणे आवश्यक आहे. यात राज्य सरकारची भूमिका निर्णायक असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. रेल्वेने आपल्या हद्दीतील काम करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र रेल्वेच्या हद्दीबाहेरील जागा राज्य सरकार किंवा पालिकेच्या मालकीची आहे. तेथील कामे पूर्ण करण्यास राज्य सरकारचे सहकार्य आवश्यक आहे.

दोन स्थानकांमध्ये काय?
रेल्वे स्थानकांमध्ये पादचारी पूल उभारण्याची योजना रेल्वेने आखली असली, तरी दोन स्थानकांमधील रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या कशी कमी होणार, हा प्रश्न रेल्वेपुढे आहे. यातही राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी रेल्वे अधिकारी करीत आहेत. जे.जे. कला महाविद्यालय आणि राईट्स यांच्या अहवालात अशा काही ठिकाणांवर लक्ष वेधले आहे. यात सायन-माटुंगा, मुलुंड-भांडुप, माहीम-माटुंगा, कांजूरमार्ग-विक्रोळी, मालाड-गोरेगाव, वडाळा-शिवडी अशा काही स्थानकांचा उल्लेख आहे. या ठिकाणी पादचारी पूल बांधणे आवश्यक आहे. मात्र मुंबईतील जागा रेल्वे, पालिका, एमएमआरडीए, जिल्हाधिकारी, अशा विविध संस्थांच्या हाती असल्याने धोरणांत एकवाक्यता नाही. त्याचा फटका विकासकामांना बसत असल्याची ओरड आहे. दोन स्थानकांमधील पादचारी पुलांसाठी रेल्वे, पालिका, राज्य सरकार किंवा संबंधित संस्था यांनी एकत्र चर्चा करून यावर तोडगा काढावा, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई
‘रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी पुलाचा अथवा सब वेचा वापर करा’, अशी उद्घोषणा वारंवार करूनही प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सर्रास रेल्वे रूळ ओलांडतात. रेल्वे सुरक्षा दलातर्फे अशा प्रवाशांवर कारवाईही केली जाते. यंदा ऑक्टोबरअखेपर्यंत केवळ मध्य रेल्वेवर ५२१० लोकांना रेल्वे रूळ ओलांडताना पकडण्यात आले. म्हणजेच महिनाभरात ५०० हून अधिक लोकांवर कारवाई झाली आहे. हा आकडा खूपच कमी असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी सांगतात. प्रत्येक स्थानकावर उभे राहून आम्हाला कारवाई करता येत नाही. अन्यथा महिनाभरात पाच ते आठ हजार लोकांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या कारवाईतून रेल्वेला साडेआठ लाख रुपयांचा दंड मिळाला आहे.